बुलडाणाः रमजान ईद (Ramjan Eid ) निमित्त आज देशभरातील मुस्लिम भाविक आपापल्या परिसरातील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून ईद साजरी करत आहेत. बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात मात्र यावेळी अनुचित प्रकार घडला. गावातील सर्व नागरिक नमाज (Namaaj) पठणासाठी जमले होते. मात्र काही तरुणांमध्ये जुन्या वादातून भांडण सुरु झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात एका तरुणाने दुसऱ्याला चाकूने भोसकले. त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद शमवला. मात्र चाकूने ज्या तरुणाला भोसकले, त्याचा मृत्यू झाला. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांतता राखावी, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संग्रामपूर तालुक्यात सध्या शांततेचं वातावरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच सदर घटनेचा तपास सुरु असून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रियादेखील सुरु आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात ही घटना घडली. या घटनेनंतर दोन गटात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जमावातील वाद शांत केला. प्राथमिक चौकशी केली असता जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेत शे. रफीक शे. गणी (वय 27 वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, सण-उत्सव काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या, या आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. व्हॉट्सअपवरील पोस्टवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून तसे काही आढळून आल्यास सुज्ञ नागरिकांनी पोलिसांच्या लक्षात आणून द्यावे , असे आवाहन पोलिसांनी केले आहे.