विठ्ठल देशमुख, वाशिम : समृध्दी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा मृत्यू झाला. महामार्गावर या बसने पेट घेतल्यानंतर बसमध्ये असलेल्या २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या सर्वांची नावे अद्याप जाहीर स्पष्ट झाली नाही. परंतु या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये स्त्रियांची संख्याही अधिक आहे. दरम्यान या अपघातग्रस्त बसमध्ये बुकींग केलेल्या प्रवाशांशिवाय इतर काही जण बसले होते. या बसमध्ये बुकींग केलेले एकूण ३३ प्रवासी होते.
अपघातग्रस्त बस ही नागपूरवरून पुण्यासाठी निघाली होती. अपघाताच्या काही तास अगोदर म्हणजेच शुक्रवारी रात्री 10 वाजता वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील एका हॉटेलवर बस थांबली. कारंजा येथील न्यू राधाकृष्ण हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी चालकाने बस थांबली होती. बसचालक अन् इतर काही प्रवाशांनी जेवण केले. त्यानंतर बस पुण्याकडे निघाली. कारंजा येथून दोन प्रवाशी विना बुकींग या बसमध्ये बसले. सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती समोर आली आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे असे प्रवाशांचे नावे आहेत. हे दोन्ही जण ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतर बस पुढे निघाली.
खासगी ट्रॅव्हलच्या या बसने रात्री ११ वाजता कारंजा टोलनाका सोडला. त्यानंतर दोन ते अडीच तासांनी बस सिंदखेडराजा येथे पोहचली. त्या ठिकाणी याबसचा अपघात झाला. एका खांबाला धडक दिल्यानंतर बस दुभाजकावर आदळून पलटी झाली. यावेळी प्रवाशांना दोन्ही दारातून बाहेर पडणे अशक्य झाले. काही जणांनी आपत्कालीन दाराची काच फोडली अन् ते बाहेर पडले. त्याचवेळी बसची डिझेल टाकी फुटली अन् तिचा स्फोट झाला. त्यामुळे बसने पेट घेतली. बसमधील २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या २६ जणांमध्ये कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील मनीषा विजय बहाले आणि संजय गोविंदराव बहाळे हे आहेत का? हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते.