बुलढाणा जिल्ह्यातील अंचरवाडी शिवारात आकाशातून एक वेगळंच यंत्र पडल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. एका शेतात हे यंत्र पडले. या यंत्रावर काही मजकूर लिहिल्याचे समोर आले. ही भाषा परिचित नसल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली. हा हा म्हणता ही बातमी पंचक्रोशीत पसरली. बघ्यांनी हे यंत्र नेमकं कशाचं आहे? यावरून खल केला. दरम्यान पोलिसांनी हे यंत्र ताब्यात घेतलं आहे.
दक्षिण कोरियन यंत्र
चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. काल या ठिकाणी आकाशातून एक कोरियन यंत्र पडले आहे. एका मोठ्या फुग्याला बांधलेले हे यंत्र आहे. हे यंत्र पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती, तर यंत्र पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंचरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात हे यंत्र आकाशातून पडले. शेतकरी शेतात गेले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले.
दरम्यान हे यंत्र नेमके कशाचे आहे? मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्रांची निर्मिती कोरिया मध्ये झाल्याचा उल्लेख आहे. तर त्यावर हवामान खात्याचे संदर्भात मजकूर लिहिला असल्याचे दिसते. दरम्यान पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने याचा पंचनामा करून यंत्र ताब्यात घेतले आहे. हे यंत्र कुठून आले याचा तपास सुरू केला आहे.
शेतात दिसले यंत्र
अंचरवाडी येथील शेतकरी संजय सीताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहेत. सोमवारी दुपारी परिहार हे मुलगा अविनाश आणि चुलत भाऊ वैभव यांच्यासोबत शेतात आले होते. त्यावेळी त्यांना फुग्याला बांधलेले हे संयंत्र, उपकरण दिसले. त्यांनी ही माहिती गावातील ज्येष्ठांना दिली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी उसळली. ही माहिती पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली. त्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यांनी या संयंत्राची पाहिली केली. त्या उपकरणावर कोरियन भाषेतील मजकूर दिसून आला. हे संयंत्र हवामानासंबंधीचे असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण हे यंत्र इतक्या दूरवर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता याची माहिती समोर न आल्याने त्याचे गूढ वाढेल आहे.