बुलडाणा : भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या कामासाठी आणि बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. तुम्हाला काम हवं असेल तर मतं द्या, काम पटलं नसेल तर मतं देऊ नका, असे ते मतदारांना थेट सभेतून म्हणतात. तसेच मोदी सरकारमधील (Pm Modi) सर्वात जास्त कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. गडकरींच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आणि त्यांच्या कामच्या धडाक्यामुळे विरोधकही त्यांचे कौतुक करता आणि आभारही मानताना दिसून येतात. आता महाविकास आघाडीतील मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळळी आहे. नितीन गडकरी हे पंतप्रधान असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना बच्चू कडू म्हणाले, गडकरी चांगला माणूस आसून, गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता आणि मोदी पंतप्रधान झाले तर आता मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला , दोघांमध्ये हा फरक असल्याचे सांगत नितीन गडकरींवर एकप्रकारे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्तुतीसुमने उधळली. शिवाय ज्यावेळी मोदींनी 100 रुपयांत गॅस वाटला त्यावेळी 400 रुपयांत सिलिंडर मिळत होते आणि आज त्याची किंमत एक हजारच्या वर गेली असल्याची टीकाही राज्यमंत्री कडू यांनी केलीय. राज्यमंत्री कडू हे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरला रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते, यावेळी भाषणामध्ये त्यांनी मोदी आणि गडकरी यांच्यातला फरक सांगितला आहे.
गेल्या अनेक दिवसात वाढलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती आणि गॅसच्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार दिवसेंदिवस वाढवत आहेत. तसेच सध्या महागाईने देशात कहर केला आहे. यावरून विरोधकांवर वारंवर मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्राने पेट्रोल, डिझेल आणि गॅसबाबत किंमती कमी करून थोडा दिलासा देणारी बातमी दिली. मात्र आधी किंमती वाढवायच्या आणि पुन्हा थोड्या कमी करून तेच लोकांना सांगत बसायचं असे धोरण मोदी सरकारचे आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही झाली आहे. त्यातच आता बच्चू कडून यांच्या विधानाने पुन्हा गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरू होऊ शकतात.