गणेश सोळंकी, Tv9 मराठी, बुलढाणा : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल उद्या समोर येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या याबाबतचा निकाल जाहीर करणार आहेत. पण त्याआधीच शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी मोठा दावा केला आहे. “निकाल त्यांच्या बाजूने लागूच शकत नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. “निकाल आमच्या बाजूनेच असेल. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आम्हाला दिला, चिन्ह आम्हाला दिलेलं आहे. आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे मेरीट आधारावर आणि घटनात्मक अधिकाराच्या आधारे हा निकाल आमच्याच बाजूने लागेल”, असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला. तर “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागूच शकत नाही. असा कुठला कायदाच देशात नाही. जगामध्ये मेजॉरिटीने कायदा बनत असतो आणि त्याच्यामुळे मेजॉरिटी आमच्याकडे आहे”, असंही आमदार संजय गायकवाड म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये तीन पक्ष आहेत आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. याच जागावाटपावर शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. “जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही. मात्र मागच्या वेळी 23, 25 जो फॉर्म्युला होता, त्यानुसार आम्ही 23 जागा लढणार. आम्ही 23 जागा लढल्या होत्या, तोच फॉर्म्युला कायम राहील. एवढ्या मोठ्या सरकारमध्ये छोट्या-मोठ्या नाराजी असतात, त्या नाराजी दूर करायला काही वेळ लागत नाही. बुलढाणा लोकसभा ही जागा शिवसेनेची आहे, आणि विद्यामन खासदार ही शिवसेनेचा आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.
“सर्वांचे लक्ष एकच आहे की 400 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा आम्हाला निवडून आणायच्या आहेत. भाजप, शिवसेनासह मित्रपक्ष कामाला लागले आहेत”, अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. “ज्यांनी कधी ग्रामपंचायत लढली नाही, ताब्यात घेतली नाही, असे अनेक उमेदवार जन्मास आलेले आहेत. त्याची कुवत किती आहे? भाजप शिवसेना फार मोठा समुद्र आहे. प्रतापराव यांचे जिल्ह्यात काम आहे, त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्या तोडीस तोड कोणी वाटत नाही”, असं रविकांत तुपकर म्हणाले.
“कोणीही उठतं आणि मंत्रालय ताब्यात घेऊ, संसद ताब्यात घेऊ असं म्हणतं. पहिले ग्रामपंचायतमध्ये निवडून या. मग संसद ताब्यात घ्यायची गोष्ट करायला पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत असतोच, आणि सगळे नेते एकत्र फिरले तर जिल्हा कव्हर कसा करणार?”, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.
यावेळी संजय गायकवाड यांना मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “तो प्रत्येकाच्या आंदोलनाचा भाग आहे. लाखो लोकांचे दाखले आज निघतात ही मोठी उपलब्धी आहे. जे दाखले निघाले त्यांना आता मराठा आरक्षणाची गरज राहिली नाही. जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत मागास आहे हे सांगता येत नाही. याच्यात घाई करण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे जोपर्यंत त्याठिकाणी आहेत, उर्वरित लोकांना आरक्षण मिळेल”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणी कुणाला इशारा दिलाय हे काही मला माहिती नाही. पण कायदा कुणी हातात घेतले तर त्याचे परिणाम काय झाले हे बघितले. त्यामुळे कुणीही हातात कायदा घेऊ नये. पण लोकशाही मार्गाने कुणी कुणाला अडवू शकत नाही. ज्यांना आंदोलन करायचं असेल त्याला घटनात्मक अधिकार आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही”, असं संजय गायकवाड म्हणाले.