गणेश सोळंकी, Tv9 प्रतिनिधी, बुलढाणा | 2 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचा एक अतिशय धक्कादायक असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संजय गायकवाड पोलिसांच्या काठीने एका तरुणाला अतिशय अमानुषपणे मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. संजय गायकवाड यांच्यासह आणखी काही जण संबंधित तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संजय गायकवाड हे बुलढाणाचे आमदार आहेत. त्यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एक लोकप्रतिनिधी भर गर्दीत काठीने बेदम मारहाण करताना पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई झाली, याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकार हा शिवजयंतीच्या दिवसाचा आहे. शिवजयंतीच्या दिवशी बुलढाण्यात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी राडा झाला. या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड हे देखील होते. यावेळी झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर संजय गायकवाड यांनी पोलिसाच्या हातातील काठी घेऊन तरुणाला मारहाण केली. या घटनेवर संजय गायकवाड यांनी भूमिका मांडली आहे. मारहाण करणारे तरुण हे चाकू घेऊन हल्ल्याच्या तयारीत होते म्हणून मी त्यांना मारहाण केलं, असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलं.
“एवढ्या 30-40 हजाराच्या गर्दीत पोलीस कमी पडले. एक मुलगी आणि तिची आई माझ्याकडे धावत आली. हे दोन पोरं आहेत, त्यांच्या कंबरेला चाकू आहे आणि ते वाद करायच्या तयारीत आहेत. मी धावत गेलो. माझा बॉडीगार्ड धावत गेला. माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडीओ बघा. त्याने बॉडीगार्डला अक्षरश: खाली पाडलं. ते दोघं शस्त्रे घेऊन हल्ला करण्याच्या तयारीत असताना मी काठी हिसकावली आणि त्याला चोप दिला”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिलाीय.