केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारा महाराष्ट्राचा बडा नेता शेतात पेरणीमध्ये गुंग

| Updated on: Jul 08, 2023 | 8:00 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल. या विस्तारात महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण याबाबत कोणतीही चिंता न करता हा नेता आपल्या शेतात पेरणीमध्ये गुंग असल्याचं बघायला मिळालं आहे.

केंद्रीय मंत्रिपदाच्या शर्यतीत असणारा महाराष्ट्राचा बडा नेता शेतात पेरणीमध्ये गुंग
Follow us on

संदीप वानखेडे, Tv9 मराठी, बुलढाणा : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धुसफूसच्या चर्चांचं खंडन केलं असलं तरी सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात अजित पवार यांच्या शपथविधीनंतर अनेक हालचाली घडत आहेत. शिवसेनेच्या गोटात बैठकांवर बैठका सुरु आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थिती काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच पुढच्या 72 तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन नेत्यांना मंत्रिपद मिळणार आहे. यामध्ये शिवेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचंही नाव चर्चेत आहे. सगळीकडे याबाबतच चर्चा सुरु आहे. पण प्रतापराव जाधव मात्र शेताच्या बांधावर पेरणीमध्ये रमले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षाचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. प्रतापरावांनी एकनाथ शिंदे यांची साथ धरली होती. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

विशेष म्हणजे आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रतापराव जाधव यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अनेकांकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांची गोची झालीय. असं असताना जाधव शेतात रमले आहे.

एकीकडे केंद्रीय मंत्रिपदाच्या आशेत असलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी आताच्या राजकीय परिस्थितीतून थोडा वेळ काढत शेतीकडे लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. खासदार जाधव हे सध्या आपल्या शेतात ट्रॅक्टरने पेरणी करत आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटातील आमदार वर्षभरापूर्वी सुरत आणि गुवाहाटी दौरा करत असताना देखील खासदार जाधव हे आपल्या शेतात मशागत करताना दिसत होते.