बुलडाणा : जिल्ह्यातल्या आमना नदीच्या पुलाचा प्रश्न काही मिटताना दिसत नाही. गावकरी रोज धोकादायक नदीपात्र पार करतात. विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी नदीपात्र हाच मार्ग आहे. याठिकाणी पूल अद्याप बनला नाही. त्यामुळं हा धोकादायक प्रवास नागरिाकांना करावा लागत आहे. त्यामुळं याठिकाणी पूल केव्हा होणार असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhedaraja) आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्यातील दोन जवळ-जवळ असलेल्या गावाला आमना नदीची सीमा आहे. जळगाव (Jalgaon) आणि पिंपळगाव (Pimpalgaon) अशी त्या गावाची नावे आहेत. या दोन्ही गावातील ग्रामस्थांना, रुग्णांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना रोज हे नदीपात्र पार करावी लागते.
आपला जीव मुठीत घेऊन इकडून तिकडे जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. नदीपात्र मोठं आणि खोल आहे. इथे अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गावाला जोडणारा पुल करावा, अशी मागणी होतेय. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव आणि पिंपळगाव या दोन्ही गावांमध्ये आमना नदी आहे. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी या आमना नदीपात्रातून जावे लागते. उन्हाळ्यात काही अडचण नसते. मात्र पावसाळ्यात सुद्धा याच नदीतून ग्रामस्थांना जावे लागत आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांनासुद्धा याच पात्रातून शाळेत जावे लागते. नदीला पूर आला तर जाताना भीती वाटते. एखादा विद्यार्थी वाहून जाईल का ?, नदीपात्रातून जाण्याची वेळ ही पिढ्यान् पिढ्या चालत आलीय. मात्र याकडे ना अधिकारी लक्ष देतात न राजकीय पदाधिकारी. त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. या नदीपात्रातून जाण्यासाठी पुल बांधावा अशी मागणी ग्रामस्थ करताहेत. हा पूल तयार झाल्यास गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास थांबणार आहे. आतापर्यंत नेत्यांनी हुलकावणी दिली. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची सामान्य लोकांची सरकार आहे. यांनी दखल घेऊन याठिकाणी पुलाचं बांधकाम करून द्यावं. विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास टाळावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.