बुलढाणाः सध्या सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सरकारच्या अनेक निर्णयांवर आणि सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. एकीकडे सरकारचे अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. या शिवगर्जना यात्रेतूनच सरकावर सुषमा अंधारे यांच्याकडून निशाणा साधत सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
बुलढाणा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या शिवगर्जना यात्रेतून विदर्भातील प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.
याबरोबरच ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याविषयीही चर्चा केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या खामगाव आणि जळगाव या ठिकाणी आज सभा झाल्या त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे..
उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्र्यांवरही जोरदार प्रहार केला.
मुख्यमंत्री विरोधकांना देशद्रोही म्हणतात त्यांचे नेते लोकांना चूनचूनके मारण्याची भाषा करत असल्याचे म्हणत सुषमा अंधारे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हे सरकार वेगवेगळ्या घोषणा आणि शिंदे-फडणवीस सरकाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
मात्र हे सरकार जास्त काळ टिकणार आहे असं वाटत नाही कारण हे सरकार टिकणार असतं तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने ते मुख्यमंत्री असण्याचा विसर पडतो आहे. देवेंद्र फडणवीस त्यांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत हे समजूच देत नाहीत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या वयात किती अंतर असलं तरी आदित्य ठाकरे विधान भवनाचे सन्माननीय सदस्य आहेत हेही राजकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारवर टीका करताना त्यांनी हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा घणाघात केला आहे. गॅस दरवाढीमुळे सामान्य माणसांना त्याच्या झळा बसणार आहेत. यावरूनही सुषमा अंधारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.