गणेश सोळंकी, Tv9 मराठी, बुलढाणा | 4 ऑक्टोबर 2023 : नारीशक्ती जिंदाबाद, असं आपण म्हणतो ते उगाच नाही. चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी महिलांमधील नारीशक्ती जागी झाली तर ती चुकीचं वागणाऱ्या लोकांना सळो की पळो करुन सोडते. बुलढाण्यात याचाच प्रत्यय बघायला मिळाला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारी शक्तीचं रौद्ररुप बघायला मिळालं आहे. ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करुन पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आलीय. या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्ररूप धारण केलं. त्यांनी अश्लील शिवीगाळ आणि 1 लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
संतोष चांदणे याने भालेगाव सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केलीय. तो हे प्रकरण आपसात मिटवण्यासाठी पैसे उकळतो असा आरोप आहे. त्याने भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबतही असंच काहीसं केलं. संतोष चांदणे याने दोन्ही महिलांकडे 1 लाख रुपयांची मागणी, तसेच अश्लील शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.
मंगला निकम आणि अनिता काळे यांची संतोष चांदणे याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केलीय. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलांकडे 1 लाखांची मागणी केली. तसेच महिला पैसे देण्यास तयार न झाल्याने त्याने महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. यावेळी निकम आणि काळे या महिलांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलेच धुतले. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
संबंधित प्रकरणी आता प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित व्यक्तीकडून अशाप्रकारे किती जणांना फसवण्यात आलं किंवा त्या व्यक्तीवर तशे फक्त आरोप करण्यात आले आहेत का? याचा खुलासा आता प्रशासनाकडून केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.