बुलढाणा (गणेश सोलंकी) : शिवसेना खासदाराचे नाव घेऊन एका महिलेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव या महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. जानेफळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच नावही महिलेने व्हिडिओमध्ये घेतलं आहे. ठाणेदार कारवाई करत नसल्याचा व्हिडिओमध्ये आरोप करण्यात आला आहे.
आरोप करणारी महिला काल सकाळपासून गायब असून जानेफळ पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. व्हिडिओमध्ये महिलेने तिचं नाव सरस्वती राठोड सांगितलं आहे. सदर महिला मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील राहणारी आहे. बाहेरगावच्या काही लोकांनी घर तोडून साहित्य चोरुन नेले, अशी तक्रार महिलेने केली. मात्र पोलीस आणि खासदार जाधव यांनी न्याय दिला नाही. उलट खासदार जाधव यांनी आपला अपमान केल्याचं तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास
महिलेने केलेले आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी फेटाळून लावले आहेत. प्रतापराव जाधव हे बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. 1995 ते 2009 ते आमदार होते. शिवसेना-भाजपा युती सरकारच्या पहिल्याकाळात ते राज्यमंत्री सुद्धा होते. 2009 पासून ते खासदार आहेत. सध्या त्यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे.