मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं. राज ठाकरे बुलढाण्यात मंचावर दाखल झाले तेव्हा हा प्रकार बघायला मिळाला. राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार तेवढ्यात सभागृहात घोषणाबाजी सुरु झाली. विशेष म्हणजे याआधी धाराशिव आणि बीडमध्ये मोठा राडा झाल्याचं बघायला मिळालं होतं. यानंतर राज ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे बुलढाण्यात कार्यक्रमासाठी मंचावर आले तेव्हा काही तरुणांनी घोषणाबाजी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेर काढलं. यानंतर राज ठाकरे यांनी आपलं बोलणं सुरु केलं. यावेळी राज ठाकरेंनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच टोला लगावला. तसेच त्यांनी सभागृहात फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी थांबण्यास सांगितलं आणि इतरांना सभागृहातून बाहेर पडण्याचे आदेश दिले.
“मी इथे भाषण करायला आलेलो नाही किंवा मेळावा घ्यायलादेखील आलेलो नाही. हा माझा काही संवाद दौरा नाही. दिवळीनंतर विधानसभेच्या निवडणुका राहतील. त्या विधानसभा निवडणुकांसाठी हा माझा मराठवाड्यापासून सुरु झालेला चाचपणी दौरा आहे. विधानसभेची निवडणूक बुलढाणा जिल्ह्यात लढवली पाहिजे की नको? नुसतं हो म्हणून होत नसतं. मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो. पण त्यासाठी जे काम करावं लागतं ते काम करण्यासाठी मी आलो आहे. मला आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी इथे चर्चा करायची आहे. त्यांच्यासोबत चर्चा करायची तुम्ही संधी दिलीत तर मी आल्याचं काहीतरी निषपन्न होईल”, असं राज ठाकरे म्हणाले.
“तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिलं तरी त्याचं तिकीट कन्फर्म झालं, असं समजू नका. तसं होणार नाही, आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं तिकीट कापलं जाईल”, असं राज ठाकरे म्हणाले.
“कृपया मला हा हॉल रिकामा करुन द्यावा. मला प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायची आहे. याच्यात जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष या सर्वांनी इथे बसून घ्यावं. महिला पदाधिकाऱ्यांनी बसून घ्यावं. कामगार सेना, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थांबावं आणि इतरांनी हॉलच्या बाहेर पडावं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.