सांगली : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर सर्वत्र या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्याचा मुद्दा लावून धरणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर सांगलीतील झरे गावात जंगी मिरवणूक काढली. यावेळी पडळकर बैलगाडा हाकताना दिसून आले. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर राज्यभरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना अनेक शर्यती काढल्याप्रकरणी अनेक जणांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्या गुन्ह्यांबाबत राज्य सरकार आता काय निर्णय घेणार का? हेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
सर्वोच्च न्यायलयाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांनीही स्वागत केले आहे. 2011 पासून बैलगाडा शर्यतीवरून बंदी होती. बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्याने अनेक बैल कत्तलखान्याकडे गेले, त्यामुळे गायींची संख्याही कमी झाली. आजपासून बैलांच्या किंमती दुपटीने, तिपटीने वाढल्या अशी प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. बैलगाडा शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शर्यतीच्या एका बैलगाड्यामागे 20 ते 25 तरुणांना काम मिळते, त्यामुळे मोठ्य प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी प्रतिक्रियाही गोपीचंद पडळकरांनी दिली आहे.
गोसंवर्धनाला हातभार लागणार
या निर्णयामुळो गोसंवर्धाला मोठा हातभार लागणार आहे, त्यामुळे आम्ही यात मोठ्या संख्येने सहभागी होऊ, असेही पडळकर म्हणाले आहेत. महाराष्ट्रात अनेक गावात बैलांच्या शर्यती होतात. खासकरून यात्रेवेळी बैलगाडा शर्यत भरवल्या जातात, त्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. खिल्लारी बैलाची संख्या यामुळे वाढणार आहे. झरे गावात गोपीचंद पडळकर यांनी काढलेल्या बैलगाडा मिरवणुकीवेळी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यात त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पडळकरांनी केलेली गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत
बैलगाडा शर्यतीवरून पडळकर मागे आक्रमक झाल्यानंतर या बैलगाडा शर्यतीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांकडून शर्यतीसाठी तयार केलेले रस्तेही मोडण्यात आले होते. मात्र तरीही गोपीचंद पडळकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त असूनही गनिमी काव्याने ठिकाण बदलून पाहटेच शर्यत पार पाडली होती. त्या शर्यतीचीही जोरदार चर्चा झाली होती.