नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यामध्ये जखमी झाले. एका महिला पोलिसाचा विनयभंग झाला. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा सर्व वाद झाला. काही अफवा पसरवण्यात आल्या. या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
नागपूर महापालिका फहीम खानच्या निवासस्थानावर हातोडा चालवणार आहे. EWS अंतर्गत एनआयटीने 30 वर्षाच्या भाडेतत्तावावर हे घर त्याच्या परिवाराला दिलं होतं. त्याच्या आईच्या नावावर हे घर आहे. नागपूर महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आज फहीम खानच घर तोडण्याची कारवाई सुरु होणार आहे. यशोदा नगर परिसरात हे घर आहे. याआधी फहीम खानला नागपूर हिंसाचार प्रकरणात अटक झाली आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. आज नागपूर महापालिका कारवाई करु शकते.
नागपूर महापालिका Action मोडवर
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की, जे या प्रकरणात दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल केली जाईल. फहीम खानच्या घरावर अनिधकृत बांधकाम असेल, तर त्यावर हातोडा चालवला जाईल. नागपूर महापालिका Action मोडवर आली आहे. नोटीस बजावल्यानंतर त्यांनी संपूर्ण घर खाली केलं आहे. आता फहीम खानच्या घरी कोणीच नाहीय.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. इयत्ता दहावीपर्यंत फहीम खान याचं शिक्षण झालय. सध्या तो 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.