नाशिकः अफगानिस्ताणमध्ये माहोल बदलला. तिथून होणारा पुरवठा नियमित झाला. त्यामुळे चक्क नाशिकमधला सुकामेवा स्वस्त झाला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अफगानिस्ताणातले अंतर्गत यादवी युद्ध साऱ्या जगाने पाहिले. अमेरिकने सैन्य वापस घेण्याची घोषणा केली आणि तालिबान्यांना जोर चढला. त्यांनी सत्ता ताब्यात घेण्यासाठी नरसंहार केले. त्यामुळे लाखो अफगान नागरिकांनी देशांतर केले. त्याचा परिणाम जगावर झाला. काळा मनुका, अंजीर, पिस्ता या वस्तूंचा पुरवठा ठप्प झाला. हे कमी म्हणून की काय कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीत अनेक बदामांची झाडे जळून खाक झाली. शिवाय तिथे बदामाला द्यायला पाणी कमी पडले. या साऱ्या घटनाक्रमाचा बाजारपेठेवर परिणाम झाला. सुकामेवाची आवक ऑगस्ट महिन्यात घटली. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या महागाईतच गेले. आता दिवाळीतही हे दर कायम राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, सध्या अफगानिस्तानमधील वातावरण पूर्वपदावर येत आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे.
दिवाळीपूर्वी आवक नियमित
जागतिक परिस्थितीचा थेट आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम पडतो. आपण कितीही अलिप्त असू द्यात. आपल्याला बाहेरच्या जगाचे काहीही देणे-घेणे नसो. मात्र, जगाला आपल्याशी देणे-घेणे असते. त्यामुळे अनेकदा आपल्या रोजच्या चहातील साखर महाग होते. तर विदेशातून डाळीची आयात झाल्यानंतर डाळीचे भाव पडतात. आता सुकामेवाबाबतही तसेच झाले असून, दिवाळीपूर्वी आवक नियमित झाल्याने भाव स्वस्त झाले आहेत.
आता होणार पौष्टीक दिवाळी
सध्या सुका मेव्याच्या दरात किलोमागे सरासरी दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण पाहायला मिळते आहे. त्यामुळे नाशिककरांची यंदाची दिवाळी पौष्टीक साजरी होणार आहे. लाडूमध्ये भरपूर बदाम खायला मिळतील. बासुंदीची लज्जत बदाम अजून वाढवतील. आणि डिंकाच्या लाडूतही ते मिठ्ठास पेरतील. एकंदर पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले असताना सुकामेव्याचे दर कमी होणे नक्कीच दिलासादायक आहे, असेच म्हणावे लागेल.
ऑगस्टमधील दर (किलो प्रमाणे)
अंजीर – 1500 रुपये
पिस्ता – 1400 रुपये
बदाम – 1200 रुपये
अक्रोड – 1100 रुपये
काळा मनुका – 600 रुपये
ऑक्टोबरमधील दर (किलो प्रमाणे)
अंजीर – 1300 रुपये
पिस्ता – 1200 रुपये
बदाम – 900 रुपये
अक्रोड – 900 रुपये
काळा मनुका – 450 रुपये
इतर बातम्याः
साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर; नाशिकमध्ये अशी रंगणार मैफल!
छळ करून पत्नीचा तब्बल 1 कोटीचा ऐवज हडपला; नाशिकमध्ये गुन्हा दाखल
आता झोपा काढा आणि पैसा कमवा, या 5 जॉबची भन्नाट ऑफर; काय आहे फंडा?https://t.co/0DCjZeiX1a#DREAM | #paidtosleep | #JABVACANCY
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2021