लातूर: प्रसिद्ध उद्योगपती आणि लातूरच्या कीर्ती उद्योग (Kirti Group) समूहाचे संस्थापक भाऊसाहेब ऊर्फ विष्णुदास भुतडा (Vishnudas Bhutada) यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. काल सांयकाळी 4.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्ष होते. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भुतडा यांच्या मागे चार मुले सतीश, अशोक, कीर्ती, भारत व एक मुलगी मीना, सुना, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. भुतडा यांच्या निधनाने लातूरच नव्हे मराठवाड्याच्या उद्योग जगताचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्याच्या (marathwada) उद्योगाला भरारी देणारं मोठं व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. उद्योगच नव्हे तर कला, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातूनही भुतडा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे.
विष्णुदास भुतडा यांनी त्या काळात मराठवाड्यासारख्या दुर्गम भागात मोठ्या मेहनतीने कीर्ती उद्योग समूहाची निर्मिती केली. आर्थिक परिस्थिती बेताचीच असतानाही त्यांनी आपला उद्योग निर्माण केला. खाद्य तेलाची निर्मिती आणि विक्री करण्याच्या या व्यवसायात त्यांनी आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण केलं आहे. कीर्ती उद्योग समूहाचं मुख्यालय लातूर येथे आहे. भुतडा यांनी आपला व्यवसाय फक्त लातूरपर्यंत मर्यादित ठेवला नाही. सोलापूर आणि नांदेडमध्येही त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आणि भरभराटीला आणला. देशभरात त्यांनी आपल्या व्यवसायाचं जाळं पसरलं आहे. त्यांनी स्वत:चा कीर्ती गोल्ड ब्रँडही निर्माण केला.
वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्यानंतर विष्णुदास भुतडा यांनी प्रचंड कष्ट करून आपला व्यवसाय निर्माण केला. त्यांनी सुरुवातीला कीर्ती गोल्ड या नावाने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा हा व्यवसाय देशातील चार राज्यात फैलावला आहे. कर्नाटकातील विजापूर येथेही त्यांनी आपला भव्य प्रकल्प उभारलेला आहे. 1930 मध्ये विष्णुदास भुतडा यांचा जन्म झाला. नगरच्या अंजनसोंड या आजोळी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव निलंगा तालुक्यातील हलकी हे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रामगोपाल तर आईचे नाव मथुराबाई होते. पण वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांच्या आईने विष्णुदास आणि किसनप्रसाद या दोन मुलांना वाढवलं. विष्णुदास यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण आजोळी झालं. नंतर त्यांनी लातूरला चुलत्याकडे शिक्षण घेतलं. त्यांचे चुलते नारायणदास लातूरमध्ये एका व्यापाऱ्याकडे मुनीम म्हणून काम करत होते. चुलत्याच्या किराणाच्या दुकानात ते बसायचे. तिथेच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि आपणही उद्योजक व्हावे असं त्यांना वाटलं.
चुलत्याकडे शिक्षण घेत असतानाच त्यांनी लहानपणी मिरच्या विकण्याचं काम केलं. नंतर त्यांनी उमरग्यातील सहकार खात्यात सुपरवायझर म्हणून नोकरीही पत्करली. नंतर ते डीसीसी बँकेत क्लार्क कम अकाऊंटट म्हणून कामाला लागले. नंतर उस्मानाबाद जिल्हा मार्केटिंगचे मॅनेजर म्हणूनही त्यांनी काम केलं. याच काळात त्यांनी गणेश ऑईल मिलची सुरुवात केली आणि खाद्यतेल निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती.