रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं?; मोदींच्या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाटेला काय?

| Updated on: Jun 10, 2024 | 8:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाटेला काय येतं? याबाबत नागरिकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर मोदी सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं?; मोदींच्या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाटेला काय?
रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं?
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात 30 केंद्रीय मंत्र्यांसाठीचं खातेवाटप, 5 राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार तर 20 राज्यमंत्र्यांसाठी विविध खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाटेला नेमकं काय येतं? याबाबतची उत्सुकता होती. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 खासदारांची निवड झाली आहे. यापैकी 2 खासदारांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद तर खासदार रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. या सर्व केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांसाठी आता खातेवाटप जाहीर झालं आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नितीन गडकरी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय देण्यात आलं आहे. तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप खासदार तथा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियूष गोयल यांना पुन्हा एकदा वाणिज्य खातं देण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर 4 राज्यमंत्र्यांसाठी देखील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना कोणतं खातं?

रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लावण्यात आली आहे. रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचं स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यातून पहिल्यांदाच खासदारकी लढवणारे आणि निवडणूक जिंकून येणारे भाजपचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनादेखील केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांना सहकार आणि नागरी उड्डाण सारख्या भारदस्त खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. तर खासदार रामदास आठवले यांना पुन्हा एकदा समाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना कोणती खाती?

  1. नितीन गडकरी -परिवहन, रस्ते विकास
  2. पीयूष गोयल – वाणिज्य

स्वतंत्र प्रभार

  • प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री

  1. रक्षा खडसे- क्रीडा आणि युवक कल्याण
  2. मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण
  3. रामदास आठवले – समाजिक न्याय आणि अधिकारीता