मुख्यमंत्र्यांचा पोटातले ओठात येत आहे. आम्हाला सत्ता द्या लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, असे ते सांगत आहेत. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लाडकी बहीण योजनेशिवाय या सरकारकडे सांगायला काहीही नाही. महिन्याला पंधराशे रुपये देऊन मते विकत घेण्याचा कार्यक्रम सरकारने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरले असेल तर ती सरकारची चूक आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच अशी चूक झाल्याची कबुली दिली आहे. लाडकी बहीण योजनेत गफला झाल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्रीच म्हणत आहेत, तर याची चौकशी ईडी, सीबीआयकडून करावी, असे पत्र मला केंद्र सरकारला पत्र लिहावे लागणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेत बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीमुळे बँकेत गोंधळ सुरू आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे. या सरकारकडून मला काहीही अपेक्षा नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आलेले हे सरकार आहे. सरकार स्थापनेसाठी त्यांनी घर, पक्ष फोडण्याचा प्रकार केला आहे. अदृश्य शक्तीने आमच्याकडून पक्ष चिन्ह ओरबाडून घेतले आहे. आजही सुप्रीम कोर्टात त्याबद्दलची केस सुरू आहे. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम या सरकारने केले आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
मी नाईलाजाने अजित पवारांसोबत आहे, पण माझे खरे नेते हे शरद पवारच आहेत, असे विधान अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेबांचे कौतूक भाजपचे लोक देखील करतात. राजेंद्र शिंगणे कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. शिंगणे यांची बँक अडचणीत असल्याने ते अस्वस्थ होते. शिंगणे संवेदनशील नेते आहेत.
वक्फ बोर्डबाबत अजित पवारांनी संसदेत भूमिका स्पष्ट केलेली नाही. आम्ही जेपीसीची मागणी केली आहे. या मागणीला चंद्रबाबू नायडू यांनी समर्थन दिले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अदृश्य शक्तीने संबंधित व्यक्ती संस्थांचा विचार न करता निर्णय घेतला तर पूर्ण ताकदीने विरोध करू. संविधान विरोधी दडपशाही आम्ही सहन करणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.