मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Central Railway) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज मध्य रेल्वेवरील ठाणे- दिवा दोन मार्गिकांच्या कामासाठी (Thane-Diva) मेगाब्लॉक (Mumbai Railway Megablock) घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक तब्बल 18 तासांचा आहे.
मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे.
लोकल, मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम
मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी आज 18 तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांपासून रखडलेले काम
गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु आहे. ही मार्गिका पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मुदत देण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी, भूसंपादन इत्यादी कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरु आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. यामध्ये सध्याचे रुळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामेही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आज 18 तासांच्या मोठ्या मेगाब्लॉकचे एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने नियोजन केले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न, 240 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी