मुंबई : बुधवार पासून अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावासाचा फटका मुंबईकरांना बसला आहे. मुंबईत धो धो पाऊस (Heavy rain in Mumbai) पडत असल्याने रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची(Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली असून सर्व लोकल 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, गोरेगाव, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. रस्त्यांवर पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवरुनही पाणी वाहू लागले आहे.
रेल्वे रुळांवरही पाणी जमा झाले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
Main line (CSMT- Kalyan /Karjat/Kasara) local trains are running late by 10-15 mins due to very heavy rain.
— Central Railway (@Central_Railway) September 8, 2022
लोकल ट्रेनचा खोळंबा झाल्याने घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे.
कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शिळाफाटा आणि ठाकूरपाडा येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे.
मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. पालघरला चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
हवामान माहिती
१८:३० वा. दि. ८ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेली चेतावणी #रायगड जिल्ह्यांतील एकाकी ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आणि पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. पुढील ३ – ४ तासांत घराबाहेर पडताना खबरदारी घ्या. -आयएमडी मुंबई pic.twitter.com/lfMaRRv1qA— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) September 8, 2022
यासह पुणे, नाशिकमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे.
मुंबई आयएमडीने पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे मुंबईकरांना पावसात भिजतच बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे.