नाशिकः नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाने (University) विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे (Certificates) चक्क डिजिलॉकर (Digilocker) सुविधेद्वारे उपलब्ध करून दिली आहेत. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत ही सोय करण्यात आली आहे. (Certificates of Yashwantrao Chavan Open University will now be available through ‘Digilocker’)
डिजिलॉकर प्रणालीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. इ. वायुनंदन यांनी केले. या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात 2018 ते 2020 या दोन वर्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहेत. याचा 2 लाख 90 हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. देशातील विद्यापीठे, राज्य शैक्षणिक मंडळांनी या डिजिलॉकरवर नोंदणी केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानंतर नोंदणी करणारे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे राज्यातले दुसरे विद्यापीठ आहे.
असे उघडा अकाऊंट
डिजिलॉकरचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना digilocker.gov.in या संकेतस्थळावर आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. डिजिलॉकर अॅप डाऊनलोड करूनही नोंदणी करता येते. त्यानंतर एज्युकेशन या पर्यायावर क्लिक करावे. त्यात मुक्त विद्यापीठाच्या नावाची निवड करावी. त्यात पदवी प्रमाणपत्र हा पर्याय निवडावा. या पर्यायात आपली शैक्षणिक माहिती भरावी. त्यानंतर पदवी प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डिजिलॉकरमध्ये मिळेल.
असे डाऊनलोड करा प्रमाणपत्र
डिजिलॉकर अॅप डाऊनलोड करून अकाऊंट उघडल्यानंतर गेट द डॉक्युमेंट फ्रॉम युनिव्हर्सिटी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर कायम नोंदणी क्रमांक टाका. परीक्षा पास झाल्याचे वर्ष निवडा आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
कोड स्कॅन केल्यास मिळेल माहिती
प्रमाणपत्रावरचा क्यूआर कोड स्कॅन केल्यास शैक्षणिक माहिती मिळेल. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरताना ज्या विद्यार्थ्यांनी आधार क्रमांक नोंदविला आहे, अशा विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र डिजिलॉकरमध्ये आधार क्रमांकास लिंक केले आहे. विशेष म्हणजे या प्रमाणपत्रास कायदेशीर मान्यता असून, त्यावर डिजीटल स्वाक्षरी आहे.
मंत्री शिंदेंनी घेतली पदवी
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून यावर्षी मार्च महिन्यात पदवी प्रदान करण्यात आली. व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंचा पदवीदान सोहळा पार पडला. विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित असलेले एकनाथ शिंदे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाशिकातील सोहळ्याला हजर राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए परीक्षा उत्तीर्ण केली.
इतर बातम्याः
नाशिकमध्ये पावसाची हजेरी; जाणून घ्या दोन दिवसांचा अंदाज
नाशिकमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार
नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला