मुंबई : सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला झटका दिल्यानंतर आता त्यावर दोन्हीकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आजचा कोर्टाचा क्लेशदायक निर्णय आहे. आम्ही सर्व प्रयत्न करतोय, आम्ही भारत सरकारकडे इमपेरिकल डाटा मागतोय, आयोग ही नेमला आहे. दुसरीकडे निवडणुका जवळ आल्या आहेत. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपवर काही गंभीर आरोप केले आहेत.
ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न
हा ओबीसी आरक्षण हाणून पाडण्याचा प्रयत्न आहे. राजकीय षडयंत्र मला 100 टक्के असल्याचं वाटतंय, फडणवीस म्हणतात मी सपोर्ट करतोय, मात्र त्यांचेच लोक कोर्टात जातात असा आरोप भुजबळांनी केला आहे. तसेच बावनकुळे ओबीसींचं नुकसान करत आहेत. तुम्ही कोर्टबाजी करणाऱ्यांना का थांबवत नाही, याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार असंही भुजबळ म्हणालेत. धुळ्याचे वाघ, गवळी आहेत ते कोर्टात जाऊन प्रश्न लावून धरत आहेत आणि ते भाजपचे सेक्रेटरी आहेत, असंही भुजबळ म्हणालेत.
मुंबईत जाऊन सर्वांशी चर्चा करू
मुंबईत गेल्यानंतर आरक्षणाबाबत सर्वांशी चर्चा करणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. ज्या निवडणुका सुरू आहेत त्या होतील, मात्र या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण मिळणार नाही. आमची कोर्टाला विनंती आहे आम्हाला वेळ द्या, वकिलांशी चर्चा करून 13 तारखेला काय करता येईल बघू असंही भुजबळ म्हणाले आहेत. तसेच राज्य सरकारने चांगले वकील दिले आहेत, मात्र त्यांचे वकील भारी पडत असल्यचंही भुजबळांनी सांगतलं आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असले तरी ओबीसी आरक्षणाचं भवितव्य अजूनतरी अधांतरीच आहे.