नाशिक : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. छगन भुजबळ यावर बोलताना म्हणालेत, गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्ट मधून संमेलन स्थळ पाहणी केली, असा काहीतरी प्रकार घडेल अशी सकाळपासून कुणकुण होती, असंही भुजबळ म्हणालेत. संभाजी ब्रिगेडशी काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. याचाही अंदाज होता. मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली आहे.
शाईफेकीसाठी पुण्यातून दोनजण आलेले
संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं. असं भुजबळ म्हणालेत. पुण्यातून 2 जण मोटरसायकलवर आले होते, त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं त्यावेली हा प्रकार घडल्याचं भुजबळांनी सांगितलंय. पंकज भुजबळ यानी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही त्यांनी काळी पावडर फेकली अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.
शाईफेक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं
शाईफेक करणाऱ्या दोन संशयीतांना ताब्यात घेतल्यांची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. या शाईफेकीच्या प्रकारानंतर साहित्य संमेलनस्थळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या शाईफेकीच्या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच शाईफेक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी असंही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखान केले असल्यास दोन्ही बाजूने कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपने मात्र या शाईफेकीचं अप्रत्यक्षरित्या समर्थन केले आहे.