पुणे- अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणजे राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात १४ नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुण्यात यलो अलर्ट जारी केला आहे. याच तीन दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची (Rain in maharashtra) शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने उद्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या दहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे. दरम्यान, गतिमान वारे वाहणार असून याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहणार आहे.
थंडीचा कडका वाढला
राज्यात पावसाचे वातावरण निर्माण होत असतानाच दुसरीकडे पुण्यासह राज्यातील इतर भागातही थंडीचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. पुण्यात यंदा १०. ८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्याच्या शिरूर , आंबेगाव या भागातही थंडीचा कडाका वाढला आहे.
हेही वाचा