मुंबई : मुख्यमंत्री आणि राज्यपालांमधील लेटर वॉरवरून राज्यात सध्या महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वार-पलटवार सुरू आहेत. राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी पत्रातून दम दिला, असा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर घटनात्मक पेच टाळण्यासाठी निवडणूक पुढे ढकलल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये दम होता तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्याची होती, असे खुले आव्हानच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारमधली सासू-सुनेचे भांडण संपूर्ण देशाने पाहिले आहे, अनेकदा राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हाही संघर्ष दिसून आलाय, मात्र आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
राज्यपालांना दम दिला गेला
मुख्यमंत्र्यांनी पत्रातून राज्यपालांना दम दिल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अध्यक्षपदाची निवडणूक नको होती, मात्र काँग्रेसला केवळ दाखवण्यासाठी हे सुरू होते असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत, महाविकास आघाडी सरकारमध्ये दम होता तर निवडणूक घ्यायची होती, निवडणूक घेतली असती तर राष्ट्रपती राजवट लागली असती, मात्र हे सत्तेला लालची आहेत. सत्ता टिकवण्यासाठी यांनी पाऊल मागे घेतले अशी खरमरीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मी राज्यपालांचा प्रवक्ता नाही राज्यपालांना काय करायचे ते त्यांना ठरवू द्या असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
सरकारमधून कोण आधी बाहेर पडणार याची स्पर्धा
महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या आधी बाहेर पडण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे, असे सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत. संजय राऊत तुमचे दोन वर्षात चांगले स्टार झाले आहेत. त्यामुळे ते काही बोलले की माध्यमं दखल घेत आहेत, मात्र घराघरात राऊतांची चेष्टा केली जाते, अशी कोपरखिळीही चंद्रकांत पाटलांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावली आहे.
लोकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाहीत
या अधिवेशनात लोकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लागले नाहीत, मात्र यांना 32 हजार कोटींच्या पुरवण्यांच्या मागण्या पास करून घ्यायच्या होत्या आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची होती. त्यांचे बहूमत आहे म्हणून दादागिरी करून बिलं पास करण्यात आली, कोणत्याही बिलावर चर्चा केली नाही, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.