अमित फुटाणे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद: “मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मागासवर्ग आयोगाचा अहवालात सकारात्मक आहे. त्यावर अभ्यास सुरु आहे. आरक्षण न्यायालयात टिकवणार, त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार आहे. आता मोर्चे आणि आंदोलन करण्यापेक्षा काय हवं आहे हे सांगायला पाहिजे”, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादेत सांगितलं.
येणाऱ्या काळात राज्यातील रस्त्यांवर सेल्फी काढण्यासाठी खड्डा शोधावा लागेल असे रस्ते तयार होणार आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणात मदत केल्याने मोठ्या आकाराचे रस्ते आगामी काळात तयार होणार आहेत. त्यापैकी बरेचसे काम सुरु असून अजून एक दोन वर्षात राज्यात चांगले रस्ते पाहायला मिळतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी होत आहे. मागास ठरवल्याशिवाय आरक्षण मिळत नाही. मराठा आरक्षणासाठी अनेक आयोग स्थापन झाले, मात्र कोणत्याही आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं नाही. जोपर्यंत आयोग कोणत्याही समाजाला मागास म्हणत नाही, तोपर्यंत आरक्षणच मिळत नाही. आधीच्या सरकारने नारायण राणेंची समिती नेमली, मात्र कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळलं. आमच्या सरकारने मागास आयोग नेमला, दोन वर्ष या आयोगाने खूप काम केलं. अभ्यास करुन मागास आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. मुख्य सचिवांकडे हा अहवाल आहे. ते अभ्यास करुन हा अहवाल सोपवतील. आम्ही मागास आयोगाला जी काही माहिती पुरवली आहे, त्यावरुन आम्हाला विश्वास आहे की या आयोगाने मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. जर मागास म्हटलं असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळणं सोपं होणार आहे. हे आरक्षण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार देईल. त्याचा सर्व कायदेशीर अभ्यास सरकारने केला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, त्यासाठी वकिलांची फौज उभा करु”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते औरंगाबादेत सावंगी आणि वैजापूर तालुक्यातील रस्त्याचं भूमीपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. दानवेंनी सिंचनाची कामं मोठ्या प्रमाणात झाली असून, स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक रस्त्याचे काम आमच्या काळात झाल्याचं सांगितलं.
इतकंच नाही तर शेतकऱ्यांना सर्वात भेडसावणारा प्रश्न विजेचा आहे, मात्र आज आमचा मंत्री दुसऱ्या राज्यात वीज विकतोय, विजेची तूट दूर झाली असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना चोवीस तास वीज दिल्याशिवाय राहणार नाही, असंही दानवे म्हणाले.
आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध: राम शिंदे
मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असून, मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आम्ही विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेतला असल्याची माहिती, ओबीसी खात्याचे मंत्री राम शिंदे यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. मागच्या सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आरक्षण दिले होते, अशी टीका यावेळी शिंदेंनी केली. तसेच धनगर आरक्षणात मागच्या सरकारने केंद्राकडे चुकीचा अहवाल पाठवला, त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. पण आमचे सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. आझाद मैदानातील आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन यावेळी राम शिंदे यांनी केले.
संबंधित बातम्या
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका: छगन भुजबळ
मराठा आरक्षण : अहवाल आला, आता अहवालाचा ‘अभ्यास’ सुरु
मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, पुढे काय?
मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 26 लाखांचा खर्च
मराठा आरक्षण: उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली
‘त्याच दिवशी’ फडणवीस म्हणाले होते, ‘हे आरक्षण घटनाविरोधी, कोर्टात टिकणार नाही’