मुंबई : राज्यात आरक्षणाचे मुद्दे चांगलेच गाजत असताना, रासप नेते महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महादेव जानकरांच्या वक्तव्यात तथ्य असल्याची भूमिका घेत संभाजी ब्रिगेडने महादेव जानकरांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर महादेव जानकरांच्या वक्तव्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराजांच्याया नावावर वाद निर्माण करू नये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर कुणीही वाद निर्माण करू नये, महादेव जानकर हे आमचे मित्र आहेत. त्यांना मी नक्कीच सांगेन की अश्या पद्धतीने वाद निर्माण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मात्र नाना पटोलेंना कोण सांगणार? पण तरीसुद्धा माझी सर्वानाच विनंती आहे की, महाराजांच्या नावाने वाद निर्माण करू नये अशी वक्तव्य करू नयेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे जानकारांच्या वक्तव्याने पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवाब मलिकांना काय प्रकरणे काढायची ती काढू द्या
नवाब मलिक यांना काय प्रकरण बाहेर काढायची आहेत ती त्यांनी खुशाल काढावीत, आम्ही त्याला घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, एसटीचा संप आहे. पेपरफुटीचा प्रश्न आहे, अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही सरकारला अधिवेशनात घेरणार आहोत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी स्थिती
महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यासारखी परिस्थिती आहे. अशी मागणी आम्ही राज्यपालांकडेही करणार आहोत, अमित शाह यांच्याशी या विषयावर काय चर्चा झाली, मात्र ती उघडपणे सांगता येत नाही, असा खुलासाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अमित शाह भाषणात काय म्हणाले हे सर्वांना माहीत आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लावला आहे.