‘ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही ते नाथाभाऊंचे नाव घेतात’, खडसेंच्या कानपिचक्या नेमक्या कुणाला?

| Updated on: Feb 03, 2021 | 6:05 PM

"जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात. ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात", अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर घणाघात केला (Chandrakant Patil slams BJP).

ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही ते नाथाभाऊंचे नाव घेतात, खडसेंच्या कानपिचक्या नेमक्या कुणाला?
एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव : “कोण चांगले काम करत आहे, कोण वाईट काम करत आहे, याकडे जनतेचे लक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार कसा वाढेल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. कोण काय म्हणतो, याकडे दुर्लक्ष करा. टीका टिप्पणी होतच राहणार आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जे आमच्यावर टीका करतात ते गावातच असतात. ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात”, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर घणाघात केला (Chandrakant Patil slams BJP).

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 11 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी दुपारी पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ खडसे बोलत होते. खडसेंनी यावेळी मार्गदर्शन करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकादेखील केली (Chandrakant Patil slams BJP).

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मूळगाव असणाऱ्या कोल्हापुरातील खानापूर येथे भाजपच्या गटाचा पराभव झाला होता. त्यामुळे खडसे यांनी नाव न घेता “ज्यांची गावात निवडून येण्याची क्षमता नाही, ते नाथाभाऊचे नाव घेतात”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

“प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात अधिक यशस्वी झाला पाहिजे. आता राज्यातील राजकारण बदलत आहे. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण हे सरकार टिकणार आहे. कार्यकर्ते आपल्याला सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून हे सरकार पडणार आहे, आपण सत्तेत येणार आहोत, असे विरोधकांना सांगावे लागत आहे. आपल्या सरकारचे 5 वर्षे असेच निघून जातील यांना पुन्हा येईल, पुन्हा येईल करतच रहावे लागेल. यांच्या अहंमपणामुळे भाजपची राज्यातून सत्ता गेली. हे सर्वांना माहिती आहे”, असा टोला खडसेंनी फडणवीस यांना लगावला.

“राज्याचे राजकारण आता बदलत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी पाय रोवत आहे. यापुढे ती अधिक मजबूत होईल. विरोधकांना कितीही वाटत असेल की हे सरकार पडेल, पण तसे काहीही होणार नाही. हे सरकार टिकणार आहे, व्यवस्थितपणे चालणार आहे”, असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला.

हेही वाचा : ‘आम्हाला तुम्ही शिकवू नका, शरजीलवर कारवाई करणार का? ते सांगा’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल