शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी उलटफेर

| Updated on: Oct 16, 2024 | 8:53 PM

महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश होत असून पक्षाची ताकद वाढत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा आहे. किशोर जोरगेवार यांच्यासारख्या अपक्ष आमदारांचा प्रवेश आणि अजित पवार गटातील काही नेत्यांची शरद पवार गटात येण्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जोरदार प्रवेश, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी उलटफेर
शरद पवार
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरु आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जावून अनेक दिग्गज नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेत आहेत. विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. आता लवकरच उमेदवारांची घोषणा होईल. त्याआधी शरद पवार गटात अनेक दिग्गज नेते प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अनेक सत्ताधारी आमदार आणि नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना विधानसभेच्या तिकिटासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाला जोरगेवार यांनी होकार दर्शविला आहे. त्यामुळे चंद्रपूरची जागा महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडे गेल्यास किशोर जोरगेवार इथून पक्षाचे उमेदवार असतील. यासंबंधी काहीच दिवसात पक्षप्रवेशाचा सोहळा होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे कालपर्यंत महायुतीला समर्थन दिलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्तेशी थेट संबंध होता. मात्र भाजपने विविध पक्षात फिरून आलेल्या किशोर जोरगेवार यांना विधानसभेचं तिकीट देण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच जोरगेवार यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. यातच त्यांना शरद पवार गटाचा प्रस्ताव आला. जोरगेवार यांची ही भूमिका महायुती आणि विशेषतः भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ही जागा महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता असून आता भाजप इथून कोणता उमेदवार निश्चित करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार गटाच्या दिशेला कोण-कोण?

अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण, दौंडचे रमेश थोरात, पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, सांगलीच्या खानापूरचे माजी आमदार सदाशिव पाटील यांची चर्चा आहे. तर आतापर्यंत अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण, खासदार निलेश लंके, बाबाजानी दुर्रानी, भाग्यश्री आत्राम, भाजपचे हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, तुमसरमधील भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे, सूर्यकांता पाटील, फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक जणांनी महायुतीची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.