राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहे. आता ते ओबीसी नेत्यांच्या बैठका घेत आहेत. त्याचवेळी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर शाब्दीक हल्ले चढवत आहे. रविवारी पुन्हा भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला केला. मंत्रिपद नाकारल्याचे कारण मला तरुणांना संधी देण्यासाठी जेष्ठांना बसवल्याचे दिले. आता मला राज्यसभेत जाण्याचे सांगितले जात आहे. तरुणांना संधी देयायची होती तर मला विधानसभेची उमेदवारी का दिली? असा सवाल अजित पवार यांना भुजबळ यांनी विचारला.
रविवारी मुंबईत माध्यमांसमोर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, किती वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे आहे, हा निकष आधी सांगितला पाहिजे. ६७ वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मग तरुणाला संधी देयायची होती तर मला का विधानसभा निवडणुकीत का उभे केले? तसेच आधीच सर्व सांगितले पाहिजे होते. तसेच तरुणांना संधी देताना काही वरिष्ठ लागतात. त्यासाठी काय नियम असतात. कंपन्यांमध्ये तशीच पद्धत आहे. तिच पद्धत राजकारणात आहे.
भुजबळ पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मला अडथळा आणला गेला. त्यानंतर राज्यसभेसाठी दोन वेळा संधी आली. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये मला डावलले गेले आहे. आता ते म्हणतात, राज्यसभेवर जा. मग विधानसभा निवडणुकीत मला निवडून देणाऱ्या मतदारांचे काय होणार? राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभेचा राजीनामा द्यावा लागणार नाही का? हे आधीच का ठरवले नाही? असे प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केले.
बैठकीत ओबीसी नेत्यांनी काय सांगितले त्याची माहिती भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले, ओबीसी नेत्यांच्या भावना अशा आहे की तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे. आता तुमचा विषय आम्ही राज्यभरात घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर झालेल्या अन्यायामुळे आम्ही त्रस्त झाला आहोत. पुढील भूमिकेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, तुम्हाला माझ्या पुढील भूमिकेची खूप घाई झाली आहे. मी अजून लोकांशी चर्चा करत आहे.
मी ओबीसीसाठी लढणार आहे. मी ओबीसीसाठी ३५ वर्षे लढत आहे. मी मराठा समाजाचा द्वेष करत नाही. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे, यासाठी मी लढत आहे. मी मराठा समाजाचा विरोधक आहे, असे चित्र निर्माण केले गेले. कोणाच्या हक्कावर गद्दा येऊ देऊ नका, असे मला म्हणायचे आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.