राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडून बोलवण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीबाबत एक महत्त्वाची सूचना केली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडावी, असं आवाहन शरद पवार यांनी राज्य सरकारला केलं आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्याला आरक्षण कुणासाठी कशासाठी याची कल्पना आहे त्याच्यासोबत बसायला काही हरकत नाही. जर कोणी आडमुठेपणाने मागत असेल तर कसं होणार? तशा आरक्षणाला न्यायमूर्ती यांनी नाकारलं, आयोगाने नाकारलं. इतर कोणालाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी आमची भूमिका आहे. सगळ्या प्रमुख पक्षांची भूमिका अशी आहे”, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
यावेळी छगन भुजबळ यांना मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ओह माय गॉड. काय मार्ग निघणार? त्यांचं म्हणणं आहे की, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. मी त्याला हो म्हणणार आहे का? काय चर्चा करणार? समाजा समाजामध्ये वाद सुरू झाले आहेत. हे कोणालाही आवडणारं नाही. मी काही मागत नाही. फक्त माझं कोणालाही देऊ नका. माझ्या ताटातलं देऊ नका”, अशी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांना बोलायला लावतात, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यावर भुजबळांनी भूमिका मांडली. “मी मुंबईचा महापौर झालो. मी आमदार झालो. तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला देखील आले नसतील. त्यांनी मला सांगावं. माझ्यावर अशी परिस्थिती नाही आली. अजून सगळं ठीक आहे”, असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं.
मनोज जरांगे यांनी विधानसभेत मराठा समाजाचे उमेदवार उभा करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. “लोकशाही आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी 288 उमेदवार उभे करावेत. फक्त त्यांनी 288 जागांमध्ये दलित समाजासाठी ज्या जागा राखीव आहेत तिथे फक्त समाजाला उभं करू नका. आदिवासींसाठी जागा आहेत तिथे समाजाला उभं करू नका. जिथे राखीव जागा आहेत तिथे मराठा समाजाला उभं करू नका. माझा माझ्या येवला लासलगाव मतदारसंघावर पूर्ण विश्वास आहे. विकास हा मुद्दा आहे. मी दिलेली कामं केली. त्यांनी 288 जागांवर उमेदवार उभे करावेत. ते 7-8 जागा निवडून आले तरी बस आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांनी ऑनलाईन धान्य वाटपवर प्रतिक्रिया दिली. “ऑनलाईन धान्य वाटप दिल्लीवरून सुरू आहे. तिथे प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना पत्र लिहिलं आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ऑनलाईन धान्य वाटप बंद करावं. आम्ही आदेश काढला आहे की 31 ऑगस्ट पर्यंत ऑफलाईन धान्य वाटप करावं. ग्रामसेवक आदी जे आहेत त्यांनी त्या गावचा ओळखून धान्य वाटप करावं,” असं छगन भुजबळ म्हणाले.