chhagan bhujbal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना वगळावे लागले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी भुजबळ यांच्या निकटवर्तीय असलेले प्रमोद हिंदूराव यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी काहीही न बोलता भुजबळ विधिमंडळाकडे रवाना झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलेले नाही. 2014 ते 2019 हा काळ सोडता छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देखील काम केले आहे. परंतु आता त्यांना संधी दिली गेली नाही. नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी अमदारांपैकी फक्त नरहरी झिरवळ यांना मंत्रीपद मिळाले आहे. भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीत अडीच-अडीच वर्ष मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनी त्यासंदर्भात रविवारी वक्तव्य केले होते.
छगन भुजबळ नाराज झाल्याच्या बातम्या आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलची तयारी सुरु केली आहे. पक्षांकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले आहेत. भुजबळ यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव यांनी रेडीसन हॉटेलमध्ये जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर हॉटेलमधून बाहेर आलेले छगन भुजबळ यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आपणास विधिमंडळात आपणास जायचे असल्याचे सांगून ते रवाना झाले.
भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी त्यांना डिवचले आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची साथ सोडली. आता ते आपल्या कर्माची फळ भोगत आहेत, असे त्यांनी म्हटले. भुजबळ यांना वगळण्यात जातीय राजकारण आहे, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.