महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या विस्तारात एकूण ३९ आमदारांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या ४२ वर गेली आहे. भाजपच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिक्त आहे. या विस्तारानंतर तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महत्वाचे विधान केले आहे. भुजबळ उपमुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर या ओबीसी नेत्यांना मंत्रीपद हवे होते. ओबीसींची ठाम भूमिका घेणारी माणसे मंत्रिमंडळात हवी होती. या संदर्भात मी भुजबळ साहेबांशी बोलणार आहे. आता भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळाले नाही. परंतु कदाचित त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येईल, असा सकारात्मक विचार आम्ही करत आहोत. ओबीसींचे आंदोलन सक्षमपणे महाराष्ट्रात आम्ही उभे करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. संभाजीराजे भोसले यांनी धनंजय मुंडे यांचा संबंध बीड घटनेशी जोडला. तसेच त्यांना मंत्रिपद देऊ नये अशी मागणी केली होती. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे भोसले यांना टोला लगावला. ते म्हणाले, कोंबड झाकले म्हणून सूर्य उगायचा राहत नाही. मंत्रिपद देऊ नका, असे म्हणणं हे कुठल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. ओबीसीबद्दल तुमच्या मनात एवढी चीड आहे का? असा सवाल त्यांनी संभाजीराजे भोसले यांना विचारला.
संभाजीराजे भोसले खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. एखाद्याला बदनाम करायचे, या पद्धतीने वागने संभाजीराजे भोसले यांच्याकडून अपेक्षित नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत ओबीसीने महायुतीच्या बाजूने निर्णय दिला आहे. या जनमताचा अपमान करू नये. आम्ही फडणवीस यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत. भाजपाचा ओबीसी डीएनए असेल तर आम्हाला निश्चिंत राहावे लागेल अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे समर्थक व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजी नगर-नाशिक राज्य मार्गावर विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी समर्थकांनी दिला.