अखेर 10 दिवसांनंतर, शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मालवणमध्ये अवघ्या 9 महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर, आपटे फरार होता. मात्र, बुधवारी रात्री साडे 10 वाजता जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली. आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुटुंबाला भेटण्यासाठी आला असताना, आपटे अलगद पोलिसांच्या हाती लागला. जयदीप आपटे कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी एक पथक कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर आणि दुसरं पथक कल्याणच्या राहत्या घराबाहेर होतं.
जयदीप आपटे कसाऱ्यावरुन लोकल ट्रेन पकडून कल्याणला आला. कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर उतरुन जयदीप ऑटो रिक्षानं दूध नाका परिसरात आला. कोणी ओळखू नये म्हणून आपटेनं तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी आणि रुमालही गुंडाळला होता. 2 बॅगा घेवून जयदीप आपटे इमारतीच्या गेटवर आला, पोलीस इमारतीच्या परिसरात होतेच. पोलिसांनी जयदीपकडे आयकार्डची मागणी करत मास्क काढायला लावला. मास्क काढताच पोलिसांना जयदीपच असल्याची खात्री झाली आणि जयदीपला पोलिसांनी अटक केली.
घाबरलेल्या अवस्थेत जयदीप ढसाढसा रडायला लागला आणि घरी भेटायला जावू देण्याची विनंती करु लागला, पण पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. शिवप्रेमींच्या दबावामुळं आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
आपटे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. 5 दिवसांची कोठडी सिंधुदुर्ग पोलिसांना मिळाली आहे. मात्र राऊतांनी आणखी एक गंभीर आरोप करत सनसनाटी निर्माण केली. आपटेच्या अटकेआधीच जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलवण्यात आलेली आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.
आपटेच्या अटकेनंतरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. मात्र, 8 महिने 22 दिवसांत महाराजांचा पुतळा कसा कोसळला. कंत्राट कशाप्रकारे मिळवलं. 6 महिन्यात पुतळा तयार करण्यासाठी कोणाचा दबाव होता का ?, पुतळ्यात भ्रष्टाचार झाला का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम पोलीस जयदीप आपटेकडून करतील.