प्रशासकीय सेवेत असणारे आणखी एक अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आशीर्वाद मिळाल्याचा दावा केला आहे. गेली 37 वर्षे प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी बालाजी पाटील खतगावकर थेट भाजप आमदाराविरोधात निवडणूक मैदानात उतरले आहे. यामुळे आता महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच खतगावकर यांनी आपल्या खासगी सचिव पदाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी काम केले आहे. मुख्यमंत्र्याचे विश्वासू अधिकारी म्हणून खतगावकर यांची ओळख होती. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर खतगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या मुखेड – कंधारमधून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र या ठिकाणी आता भाजपाचे विद्यमान आमदार तुषार राठोड प्रतिनिधी करत आहेत. त्यामुळे मुखेड – कंधार मतदारसंघात भाजप व शिंदे गटात उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपण राजकीय निर्णय घेतला आहे, असे बलाजी पाटील खतगावकर यांनी म्हटले आहे. महायुतीत निवडून येणे महत्त्वाचे आहे. मी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, असा आग्रह सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मुखेडमधून मी उमेदवार करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सनदी अधिकारी असलो तरी लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थाने राज्यकर्ते असतात, असे खतगावकर यांनी म्हटले.
भाजप आमदार तुषार राठोड विद्यामान आमदार आहेत, हे मला माहीत आहे. मात्र निवडून येणे हा महत्त्वाचा घटक आहे, असे बालाजी पाटील खतगावकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घेतील. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे काम करत आहे. यामुळे जो व्यक्ती निवडून येईल त्यालाच महायुती उमेदवार देईल, अशी आपणास खात्री आहे, असे त्यांनी म्हटले.
खाजगी सचिव म्हणून मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे. मुखेड – कंधार विधानसभामध्ये माझे दोन राउंड पूर्ण झाले आहेत, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व आरपीआयचे सर्व नेते मला पाठिंबा देत आहेत. माझ्या कामाची पद्धत सर्व नेत्यांनी फार जवळून पाहील आहे, असे बालाजी पाटील यांनी म्हटले.