“स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कामराला हे माहित असलं पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण गाताना जे आक्षेपार्ह शब्द वापरले त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
“अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. “हे चुकीच आहे. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘स्वैराचार करता येणार नाही’
“कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाच पुस्तक दाखवतात. त्या संविधानाची त्यांना माहिती असेल, त्यांनी वाचलं असेल, तर संविधानाने सांगितलय स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.