मुंबईः विमानात बसून कोकणात जाण्याचं कोकणवासीयांचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. पण उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. सोशल मीडियावर भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरू असून, प्रत्येकाची चिपी विमानतळाच्या उद्घाटनचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. विशेष म्हणजे या श्रेयवादाच्या लढाईत सेम टू सेम पोस्टर, बॅनर प्रसिद्ध करण्यात आले असून, फक्त ह्या नेत्याच्या फोटोऐवजी त्या नेत्याचा फोटो लावण्यात आलाय. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
पण दुसरीकडे या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी त्यावर बहिष्कार घातलाय. चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन मानापमान नाट्य रंगणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद आता निमंत्रण पत्रिकेवर येऊन ठेपलाय. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर टाकलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यावरुन नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले होते.
दरम्यान, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावलाय.
इतर बातम्या :
आयकर विभागाच्या छाप्यांबाबत खुलासा करा, भाजपचं महाविकास आघाडीला आव्हान
‘मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता’, अजितदादांचा शिवतारेंना खोचक टोला
Chipi Airport Inauguration Everything is the same, posters, banners, information, a photo of this leader instead of just a photo of this leader