मुंबई : ख्रिसमसचा उत्सव गोव्यात साजरा करण्याचा बेत आखणाऱ्या कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून जाताना ही गाडी खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे. कोरोना काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे ख्रिसमसला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची ट्रेनमध्ये गर्दी होऊ शकते, प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी ही स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी सुटणार ट्रेन
नवी वर्षाचे स्वागत तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ही गाडी आठवड्यातून एकदा चालवण्यात येणार आहे. ( 09619-09620) ही गाडी अजमेर ते वास्को द गामा जंक्शन दरम्यान येत्या 25 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन शनिवारी सकाळी नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजता गोव्यात पोहोचेल. साधारणपणे हा एक दिवस म्हणजेच 24 तासांचा प्रवास असणार आहे. ती अजमेरवरून येताना कोकण रेल्वे मार्गावर खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
दरम्यान देशावरील कोरोनाचे सावट अद्यापही कमी झालेले नाही. कोरोना काळात अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरीच असलेले नागरिक ख्रिसमस आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने गोव्यात येऊ शकतात. रेल्वे गाड्यांना गर्दी वाढू शकते. गर्दी वाढल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. हे सर्व टाळून प्रवाशांना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?