बदलापुरातील घटनेनं नागरिक संतप्त, पण ही घटना नेमकी समोर आली कशी?

| Updated on: Aug 20, 2024 | 4:34 PM

बदलापुरातील आदर्श विद्यालयातील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये एकच संताप उसळला. लोकं रस्त्यावर उतरली. बदलापूरकरांनी लोकल सेवा बंद पाडली. गेल्या ८ तासांपासून रेल्वे बंद आहेत. आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं जात आहे. पण लोकांकडून गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी केली जात आहे.

बदलापुरातील घटनेनं नागरिक संतप्त, पण ही घटना नेमकी समोर आली कशी?
Follow us on

पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टरवर रुग्णालयात अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बदलापुरात चिमुकलींचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आलीये. या घटनेनंतर बदलापूरकर संतप्त झाले आहेत. सर्वपक्षाच्या नेत्यांकडून बदलापूर आज बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. इतकंच नाहीतर आज आंदोलकांनी रेल्वे देखील अडवून धरल्या. आंदोलक रेल्वे रुळावर उतरल्याने गेल्या ८ तांसापासून रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कल्याण ते कर्जत अप आणि डाऊन मार्गावर परिणाम झाला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरातील आदर्श विद्यालयात दोन चिमुकलींवर अत्याचार झाले. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवला. याशिवाय शाळा प्रशासनाने देखील यावर कोणतीही कठोर कारवाई तात्काळ करणे गरजेचं होतं. आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची ने-आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन करण्यात आले आहे.

ही घटना समोर कशी आली

घटना तेव्हा समोर आली जेव्हा एका एका चिमुरडीने आपल्या आईकडे तिला गुप्तअंगात त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पालकांनी तिला डॉक्टरांकडे आणलं. जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली. आपल्या चिमुकलीसोबत जे घडलंय ते ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनच सरकली. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. पण या घटनेवर कारवाई करण्यास पोलिसांक़डून दिरंगाई झाली. त्यामुळे बदलापुरात मोठा उद्रेक झाला.

अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीने चिमुरडीला आपल्या वासनेचं बळी बनवलं. आदर्श विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना जशी जशी सोशल मीडियावर पसरली. लोकांचा उद्रेक झाला. लोकं रस्त्यावर उतरली. संताप व्यक्त करु लागली. पोलिसांनी रेल्वे रुळावरुन आंदोलकांना हटवण्यासाठी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी ही मागे जावं लागलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असं संतप्त नागरिकांकडून सांगितले जात आहे.

सरकारच्या वतीन मंत्री गिरीष महाजन बदलापूर स्टेशनवर पोहोचले आहेत. बदलापुरात कडकडीत बंद पाळला जात आहे. रिक्षा, दुकानं बंद आहेत. बदलापुरात तणावाचं वातावरण आहे. गिरीष महाजन यांच्याकडून सातत्याने आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जबाबदार पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली आहे. आंदोलकांकडून दोषीला फाशी देण्याची मागणी होत आहे.