“काम करताना काही अडचणी आणि मर्यादा असतात. पण त्यावर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजेत, हा प्रयत्न करायचा आहे. 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं हा मंत्री नव्हता मुख्यमंत्री म्हणून काम कसा करेल. काहींना वाटायचं यांच्याकडे नवखं काम आलं आहे. महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं सातत्याने विदर्भाच्या प्रश्नावर बोलणारा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करायचा का? पण माझ्या पाच वर्षाच्या काळात विदर्भासाठी काम केलं. पण महाराष्ट्रातील कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. ते नागपूरमध्ये मीडियाशयी बोलत होते.
“विदर्भातील 80 प्रकल्प पूर्ण केले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. आपण पाच वर्षात मोठी भरारी मारली. गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तेव्हा ऊर्जा, गृह खात्यात चांगलं काम केलं. ऊर्जा विभागात तर पुढच्या 25 वर्षाचा रोड मॅप तयार केला. दोन वर्षात अशी परिस्थिती येईल की उद्योगासहीत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रीसिटीचे दर आपण कमी करू. एवढं काम केलं आहे. इरिगेशनमध्ये सहा नदी जोड प्रकल्प कामे हाती घेतले आहे. त्याने महाराष्ट्र बदलून जाणार आहे” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फडणवीसांनी सांगितली, भारताची पुढची स्टिल सिटी कोणती?
“भारतातील नंतरची स्टिल सिटी म्हणून गडचिरोली उदयाला येईल. काल दोन नक्षलवाद्यांनी समर्पण केलं आहे. आता डीपमध्ये आपण ज्या भागात जात नव्हतो, तिथे जात आहे. पुढच्या काळात निकराची लढाई होईल. गडचिरोली सारखं क्षेत्र आपण बदलणार आहोत. विदर्भात ज्या प्रकारे गुंतवणुकीच्या संधी दिसत आहे, त्यातून विदर्भालाही औद्योगिक इको सिस्टिम उभी राहणार आहे. हे सर्व आव्हानं आहेत. हे करत असताना आम्ही ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्याही आम्हाला चालवायच्या आहेत. या योजनांचा भार आमच्या अर्थ संकल्पावर पडेल. पण त्यांचही नियोजन करत आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.