महाराष्ट्र सरकार दिल्लीतून चालतं? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांचं सडेतोड उत्तर

| Updated on: Sep 25, 2024 | 8:39 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही दिल्लीत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळावी यासाठी जात नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. दिल्लीत महाराष्ट्रासाठी विविध योजना आणि प्रकल्प आणण्यासाठी जातो, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र सरकार दिल्लीतून चालतं? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांचं सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आरोप करतात की, शिंदे सरकार दिल्लीतून चालतं. या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही दिल्लीत जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी जातो. आम्ही दिल्लीला जातो तर महाराष्ट्रातून काही घेऊन येतो. आम्ही दिल्लीत यासाठी जात नाहीत की आम्हाला मुख्यमंत्री बनवावं. आम्ही तिथे जातो तर रेल्वे, रस्ते, सिंचन, नगर विकास संबंधित अनेक विकास प्रकल्पांचे प्रस्ताव महाराष्ट्रात घेऊन येतो. केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार राहिले तर फायदा होतो. महाराष्ट्राला देखील त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रात सेमीकंडक्टर कंपनी येत आहे, नवी मुंबई विमानतळ बनत आहे, विरोधी पक्ष तर कधी आम्हाला क्रेडीट देणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही तुमच्या नेतृत्वात लढवणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला असता, “आम्ही टीम बनून काम करत आहोत. आम्हाला खुर्चीचं लालच नाही. आम्ही आजही टीमच्या रुपात काम करत आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महिलांकडून सुरु झालेली कॅश बेनिफिट योजना शेवटी काय आहे? ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे की देवाभाऊ लाडकी बहीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही तीनही पक्ष मिळून एक टीम म्हणून काम करत आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आधीचे शिंदे आणि आताचे मुख्यमंत्री शिंदे यात फरक काय?

आधीचे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री बनल्यानंतरचे एकनाथ शिंदे यांच्यात काय फरक आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी काहीच बदल झाला नसल्याचं सांगितलं. “मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी कधीच याचा विचार केला नाही की, मला काय मिळणार म्हणून? मी काम करत गेलो, मला जनतेच्या इच्छेनुसार मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. दोन वर्षात इतक्या मोठ्या प्रोजेक्ट्स अंमलात आणले, रामराज्यावर इंडस्ट्री विश्वास करत आहे. ही सर्व इकोसिस्टिम आम्ही तयार केली आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘अमित शाह यांनी मुंबईत यायला नको का?’

एकनाथ शिंदे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी जागावाटपात कोणताही अडथळा नसल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता, “त्यांनी मुंबईला यायला नको का? मुंबई देशात नाहीय का? अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात खूप मोठं काम केलं आहे. साखर इंडस्ट्री खूप कठीण काळातून जात होती, अशा परिस्थितीत अमित शाह यांनी 10 हजार कोटी रुपये माफ केले, हे सर्वांना माहिती आहे का?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.