‘पापाचा घडा कोणाचा भरला हे…’, एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

| Updated on: Jul 07, 2024 | 5:31 PM

"उद्धव ठाकरेंच्या सेनेचा लोकसभेत 42 टक्के स्ट्राईक रेट होता. तर आमच्या 47 टक्के स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा. विधानसभेत या. लोकसभेत कशा जागा मिळाल्या, कोणामुळे मिळाल्या, ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे", असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

पापाचा घडा कोणाचा भरला हे..., एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो
Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “लहान बाळासारखे किती वेळा रडणार? ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्हाला सहाव्या नंबरवर जनतेने टाकलेलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला दुसऱ्या नंबरची मतं मिळालेली आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. “लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिलं, उद्धव ठाकरेंच्या पक्षापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाले. आम्हाला 19 टक्के मते मिळाली, तर ठाकरे यांना 14 टक्के मतं. लोकांनी आता शिक्कामोर्तब केलंय”, असादेखील दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं. आम्ही ऐकून 13 जागा लढलो. त्यापैकी 7 जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मतं आम्ही जास्त घेतले. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा 42 टक्के स्ट्राईक रेट होता. तर आमच्या 47 टक्के स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा. विधानसभेत या. लोकसभेत कशा जागा मिळाल्या, कोणामुळे मिळाल्या, ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

‘याचा परिणाम विधानसभेत भोगावा लागेल’

“शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे. याची प्रचिती विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली, अभद्र युती केली. याचा परिणाम विधानसभेत भोगावा लागेल”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. “स्वतःच्या गेट बाहेर न येणारे शेताच्या बांधावर जाऊन भेटत आहेत, याचा आनंद आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

“महिला-भगिनींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला 18 हजार रुपये देत आहोत. तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती दिलेली सन्मानाची भेट आहे. आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील”, असंदेखील प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

‘पापाचा घडा कोणाचा भरला हे…’

“पापाचा घडा कोणाचा भरला हे उद्धव ठाकरेंना विधानसभेत जनता ठरवेल. महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचं काम आणि आमचं दोन वर्षाचं काम याची जनता तुलना करेल. जनता काम करणाऱ्याच्या पाठीशी उभी राहील. आम्ही लाडली योजनेतील अटी कमी केल्या आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाला.

“नियमित कर्ज भरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देण्याची घोषणा त्यांनी केली त्याचे पैसे आम्ही देतोय. त्याच्या काळात वीजबिल माफ करू म्हणून निवडणूक लढवल्या. नंतर प्रिंटिंग मिस्टेक आहे, असं आम्ही करणार नाही. शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे. ती कायमस्वरूपी राहील. हे शेती पंप सोलारवर आम्ही कन्वर्ट करू. जे वीजबिल माफ केलं आहे ते पर्मनंट राहील”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.