शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी बदलापूर अत्याचारच्या घटनेवरुन संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून उद्धव ठाकरे यांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत थेट त्यांच्या वक्तव्यावर एसआयटी चौकशीची मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देऊ, असं म्हटलं होतं. या घटनेबाबत बोलताना शिंदे यांनी नुकतंच एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा दिल्याचं सांगितलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या त्या प्रश्नाला एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात भर कार्यक्रमात कोर्टाची कॉपी दाखवत प्रत्युत्तर दिलं.
“दोन-चार महिन्यांपूर्वी पुण्याच्या मावळमध्ये एक अशी केस झाली होती. त्या केसमध्ये आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात, कुठली फाशी झालीच नाही, काय झालं? त्यावर एक मोठं चर्चासत्र सुरु आहे. पण मी आपल्याला सांगतो. मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आहे. तुमचा हा एकनाथ शिंदे भाऊ कधीही खोटं न बोलणारा भाऊ आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, घटना मावळची होती. मे 2024 मध्ये तेजस दळवी याला फाशीची शिक्षा झाली. पोलिसांनी काम केलं. फास्टट्रॅक लावलं आणि तपास केला. माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मंचासमोर बसलेल्या शेकडो महिलांना कोर्टाची ऑर्डर दाखवली.
“त्यांनी म्हटलं फाशी दिली गेली. त्याबाबत एसआयटी नेमा. कोणता प्रसंग होता त्याची चौकशी करा. कुणाला फास्ट ट्रॅक चालवून फाशी दिली त्याची चौकशी करा. त्याची चौकशी करण्यासाठी वेगळी एसआयटी नेमा. क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला आहे. त्यांना जनतेच्या भावनेशी खेळता येतं. गद्दार व्यक्ती मुख्यमंत्री झाली हे दुर्देव आहे. जनतेच्या भावनेशीही गद्दारी केली जात आहे. याची खंत वाटते”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता.
“आतातायी पाऊल उचलणयाचं काम कधी होतं. जेव्हा यंत्रणा काम करत नाही तेव्हा. पालकांची दखल घेतली असती. गुन्हा दाखल केला असता तर हा प्रसंग आला नसता. जनतेचा उद्रेक झाला तर त्यात राजकारण झालं असं म्हणणं आणि ज्यांना आंदोलन केलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल करणं असं बघितल्यावर आग लागो तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ येते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“क्षणभर राजकीय कार्यकर्ते असतील तर काय चुकलं त्यांचं. ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला नसता का. काल सुषमा अंधारे तिथे जाऊन बसल्या म्हणून गुन्हा दाखल झाला. नाही तर तो दुसरा नालायक वामन म्हात्रे सुटलाच असता. हेच तर माझं म्हणणं आहे. जर का तुम्हाला यात राजकारण वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या काळात गुन्हे घडत आहेत. ही शाळा आरएसएस किंवा भाजपच्या संपर्कातील व्यक्तीची आहे अशी माहिती आहे. मला माहीत नाही. पण कालचा उद्रेक हा सामूहिक आहे”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवर मांडली.