सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार – मुख्यमंत्री

| Updated on: Aug 31, 2024 | 4:23 PM

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा सर्वाधिक लोकप्रिय झालेला उपक्रम आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यात जमा झाले. पण काही लोकं याच्या विरोधात कोर्टात गेले. पण कोर्टाने देखील त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. ही योजना बंद पडू देणार नाही. असं वक्तव्य मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार - मुख्यमंत्री
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख बहिणींच्या खात्यात पैसे वर्ग केले. ३ हजार २२५ कोटी रुपये दिले. दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख लाभार्थी आहे. १ हजार ५६२ कोटी रुपये वितरीत केले आहेत. एक कोटी ६० लाखापर्यंत आपण पोहोचलो आहोत. अडीच कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जाणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं. आम्ही सांगितलं काळजी करू नको आम्ही तिघे भाऊ मजबूत आहोत. तीन कोटीपर्यंत आकडा गेला तरी चालेल.’

‘तिजोरीतील पैसे आपल्या बहिणींचे आहेत. भावांचे आहेत. त्याचा जास्तीत जास्त वापर करू. राज्यातील करोडो बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तो आनंद पाहिल्यावर शासन म्हणून, सरकार म्हणून आनंद मिळत आहे. लोकांच्या कामी येतोय याचा आनंद वाटतो. महिला मोबाईल दाखवत होत्या. खात्यावर पैसे आल्याचं सांगत होत्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.’

‘आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या योजनेमुळे आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. विरोध किती काही म्हटलं तरी तुमचं सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही. बंद होणार नाही, नाही नाही नाही…’

‘विरोधक म्हणतात ही योजना चुनावी जुमला आहे, फसवी घोषणा आहे. पैसे काही येणार नाही. वाट बघत बसा. पण जसे पैसे खात्यात आले, तसे विरोधकांचे चेहरे पडले. बुरी नजरवाले तेरा मुंह काला. मनंतर म्हणाले, पैसे काढून घ्या. नाही तर सरकार पैसे काढून घेईल. पण हे सरकार देणारं आहे. घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. तुम्हाला विश्वास देतो. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही. ह आमच्या भावांची ओवाळणी फक्त रक्षाबंधनासाठीची नाही. कायमची आहे. माहेरचा आहेर आहे. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढवा. राज्यात अनेक योजना सुरू आहे. तुम्ही ताकद द्या १५०० ते २००० होतील. २००० चे २५०० होतील. २५०० ते ३००० होतील. आम्ही हातआखडता घेणार नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केलं तरी काही फरक पडणार नाही. आम्ही देणारे आहोत. तुम्ही फक्त ताकद द्या.’

‘ही योजना बंद करण्यासाठी काही लोक कोर्टात गेला. त्यांचा इतिहास बघा. कुणाचे आहेत हे लोक. मी तेव्हाही म्हणालो होतो कोर्ट आमच्या बहिणीवर अन्याय करणार नाही. बहिणींना न्याय देईल. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.’

‘दीड हजार रुपये बहिणींच्या खात्यात गेले तर तुमच्या पोटात का दुखतंय. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही. ग्रामीण भागातील महिलांना घर चालवताना कसरत करावी लागते.’