एकाच दिवशी दीड कोटी महिलांना 3 हजार रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना महत्त्वाचे आदेश, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट

| Updated on: Jul 24, 2024 | 10:37 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. लाडकी बहीण योजनेचे काम 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना केला आहे.

एकाच दिवशी दीड कोटी महिलांना 3 हजार रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना महत्त्वाचे आदेश, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट
मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना महत्त्वाचे आदेश, लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट
Follow us on

राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यभरातील लाखो महिला अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. पण लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात त्याआधीच दोन महिन्यांची आर्थिक मदत जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच दोन महिन्यांचे योजनेचे पैसे पाठवण्याच्या तयारीत आहेत. याचाच अर्थ राज्यातील दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3 हजार रुपये मिळणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनाच्या दिवशी दीड कोटी लाडक्या बहि‍णींना 3 हजार रुपये गिफ्ट देणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी 2 महिन्यांचे पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून राक्षबांधनाच्या दिवशी महिलांना गिफ्ट मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. लाडकी बहीण योजनेचे काम 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा, असा आदेश एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांना केला आहे. मुख्यमंत्र्यांचे 19 ऑगस्टला दीड कोटी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. एकाच दिवशी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा करण्याचा सरकारचा निर्धार आहे.

जळगाव जिल्ह्यात तब्बल 4 लाख महिलांनी भरले अर्ज

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत 4 लाख 27 हजार 291 महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. 1 लाख 73 हजार 556 महिलांनी ऑनलाईन तर 2 लाख 53 हजार 735 महिलांनी ऑफलाइन अर्ज भरले. जिल्ह्यातील एकूण 7 हजार 672 शासकीय मदत केंद्रांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले.

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक जळगाव आणि जामनेर तालुक्यात तब्बल 55 हजारांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. जळगावच्या तलाठी कार्यालयांमध्ये महिलांची होणारी गर्दी कमी झाली. कागदपत्रांच्या अटी शर्ती शिथिल केल्यामुळे महिलांची गर्दी कमी झाल्याची तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती आहे. तलाठी कार्यालयांसह सेतू सुविधांमध्ये आता शैक्षणिक दाखल्यांना प्राधान्य दिले जात आहे.

गिरीश महाजन यांच्या जळगावच्या कार्यालयात 22 हजार महिलांचे अर्ज भरले

जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने तब्बल 22 हजार महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याची सुविधा विनाशुल्क महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकच छताखाली आधार कार्ड अपडेट, उत्पन्नाचा दाखला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घेण्याची सोय करण्यात आली आहे. महिलांची गर्दी होवू नये यासाठी टोकन पद्धतीचा वापर केला जातोय.

कार्यालयात पंखा तसेच खुर्च्यां अशी महिलांसाठी सुसज्य व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महिलांना उपलब्ध असते. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी दहा ते बारा कर्मचाऱ्यांची स्वतंत्र टीम काम करत आहे. एकाच ठिकाणी सर्व सुविधा आणि सुसज्ज अशा व्यवस्था आणि सेवेमुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. महिलांचाही भाजप कार्यालयात अर्ज भरून घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय.

वाशिममध्ये 1 लाखापेक्षा जास्त अर्ज भरले

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ३०७ महिलांनी अर्ज भरले असून, यामध्ये कारंजा तालुक्यातील सर्वाधिक ३६,४९१ अर्जाचा समावेश आहे.तर यात ५५ हजार १६१ ऑनलाइन व ८३ हजार १४६ ऑफलाईन अर्जाचा समावेश आहे.