महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलं. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना या जनतेसमोर आहेत. आम्ही लाडक्या बहिणींपासून ज्येष्ठांपर्यंत, शेतकऱ्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांना सत्तेचा वाटेकरी केला. सत्ता ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. सत्ता ही सर्वसामान्य लोकांची आहे. या सत्तेत त्यांना योजनांच्या माध्यमातून वाटेकरी बनून या महाराष्ट्राला दाखवलं आहे. म्हणून महाराष्ट्र प्रगतीकडे चालला आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
“महाराष्ट्र उद्योगात एक नंबर आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधा, कल्याणकारी योजना यामध्ये एक नंबर आहे. नक्कीच याचे फलित या येणाऱ्या 20 नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी बघायला मिळेल. मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामांचं मूल्यमापन होईल. आम्ही कधीही न झालेला विकास महाराष्ट्रात केला. याची पोचपावती महाराष्ट्राची जनता दिल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताने या निवडणुकीत जिंकून येईल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. एका मजबुतीने, ताकदीने आणि विकास कामांच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“आम्ही टीम म्हणून काम करतोय. आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मतांनी जिंकून येईल. विरोधक जेव्हा जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम चांगलं असतं आणि जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतात तेव्हा निवडणूक आयोग, ईव्हीएम वाईट असतं. हरियाणात जेव्हा काँग्रेस पुढे चालली होती तेव्हा त्यावेळेस पेढे वाटत होते. त्यांच्या मनात लाडू फुटत होते. ढोल वाजवत होते. जसा त्यांचा निकाल लागला तसा त्यांचा ढोल फुटला. मग ईव्हीएम खराब झालं. मग निवडणूक आयोग खराब झालं. अशी दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील विरोधी पक्ष घेत आहे हे जनतेला माहिती आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.