आज 1 मे महाराष्ट्र दिन. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईच्या हुतात्मा चौकात येऊन 106 हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “हे सर्वसामान्यांच सरकार आहे, आरोपांकडे लक्ष देत नाही. विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात 10 वर्षात प्रगती झाली. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. आम्ही आरोपांना उत्तर न देता, कामाने उत्तर देतोय. जनता सूज्ञ आहे. जनता काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते. शिव्या शाप देणारे, घरी बसलेल्यांना साथ देत नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.
गिरणी कामगारांच्या घरांविषयी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. “मुंबई ही कामगारांच्या कष्टाने, मेहनतीने उभी राहिली. सर्वातआधी आमच्या सरकारने गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय घेतला. जवळपास 5 हजार गिरणी कामगारांना घर देण्यात यशस्वा ठरलो, याचं समाधान आहे. जेवढे गिरणी कामगार पात्र आहेत, त्या सर्वांना जिथे शक्य आहे, तिथे घर देणार ही एक मोठी अचिवमेंट ठरेल. त्यांच्या कष्टात, घामाच चीज झाल्याच आम्हाला समाधान मिळेल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘राज्यकर्ते कोण-काय करतं, हे मागे राहतं’
महाराष्ट्राने देशाला विचार दिले, दिशा दिली. पण त्याच महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बिघडताना दिसतेय, या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “महाराष्ट्र एक संस्कृत राज्य आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. निवडणुका येतात-जातात. पण राज्यकर्ते कोण-काय करतं, हे मागे राहतं. दुर्देवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. रोज शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला-पाहायला मिळत नाही” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.