विधिमंडळाच सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मागच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा केली होती. आज या योजनेचा फॉर्म मिळवण्यासाठी राज्यातील विविध केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’संदर्भात मोठी घोषणा केली. “या योजनेसाठी जीआर काढण्यात आला आहे. योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18000 रुपये सरकार देणार” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे. 46000 हजार कोटी रुपये माता-भगिनींना देणार आहोत. त्याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला काही द्यायच म्हटलं की, विरोधकांच्या पोटात दुखतं” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“जे चांगलं आहे, ते चांगलं म्हटलं पाहिजे, जिथे चुकत असेल तिथे सूचना करा. विरोधी पक्षाने चांगलं म्हटलं असं ऐकिवात नाही. कौतुक करता येत नसेल, तर बिनबुडाची टीका टाळली पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ हा मी, दोन्ही उपमुख्यमंत्री महायुती सरकारच्या भावंडांकडून बहिणींना दिलेला माहेरचा आहेर आहे. हा आहेर नियमित देत राहणार. काळजी करु नका. आपल्याकडे जो जुना डेटाबेस आहे, त्यातून माहिती घेऊन 2.50 लाख बीपीएल धारकांसाठी तात्काळ योजना सुरु होईल” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, ते…’
“कुणीही सरकारी कर्मचारी बहिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निलंबित करुन जेलमध्ये टाकू. माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही. जो मागत असेल, त्याची तक्रार करा. जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार?” असं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.