कोल्हापूर : ना राज्याचा, ना भाषेचा अभिमान अशी माणसे तुमच्या बोकांडी बसवली. जाऊ दे, माझी जीभ अडकायची अशी टीका चंद्रकांत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. कोल्हापूर उत्तर पोट (Kolhapur North) निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका केली. तुम्हाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही, असे ते म्हणाले. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, अरूण दुधवडकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. ते म्हणाले, की राज्याच्या हितासाठी आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र आलो. पाठीत वार करणारी आमची अफजलखानाची औलाद नाही. बेळगाव महानगरपालिकेवरचा भगवा कोणी खाली उतरवला? तुमचा करंटेपणा आहे. तुमचा नकली भगवा तिकडे फडकवला, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसला मतदान करणे पाप असेल तर मेहबुबा मुफ्तीसोबत युती करताना पुण्य होते का, असा सवाल त्यांनी केला. खोटे सांगून कदाचित इतर राज्यात तुमचे राजकारण चालत असेल, पण महाराष्ट्रात त्याला फळ लागणार नाही. एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता, असे ते म्हणाले.
शिवसेना जनाबसेना झाली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले. तसेच ते म्हणाले, हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीत ज्याला आम्ही मंदिर मानतो, तिथे अमित शहांनी दिलेला शब्द का मोडला? समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायला तुमचा विरोध का होता, असा सवाल त्यांनी केला.
तुमचा भगवा खरा नाही, शिवसेनेच्या स्थापनेपासून आम्ही झेंडा, नेता, रंग बदलला नाही, असे ते म्हणाले. तुमच्या किती होर्डिंग्सवर अटलजी, अडवाणी आहेत? तुमच्या होर्डिंग्सवर आता एकच फोटो आहे. आम्हाला कळत नाही, हा देशाचा पंतप्रधान आहे की सरपंच आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी भाजपावर केली.