मुंबई: अत्यंत जवळच्या आणि निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना पुरती हादरून गेली आहे. दहा पाच नव्हे तर तब्बल 46 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. म्हणजे जवळपास अर्ध्याहून अधिक शिवसेना (shivsena) शिंदे यांनी खालसा केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आता पुढे काय होणार? उद्धव ठाकरे या बंडावर काय प्रतिक्रिया देणार असंच सर्वांना वाटत होतं. उद्धव ठाकरे हादरून गेले असतील, ते बंडखोरांना सुनावतील, भाजपवर टीका करतील अशीही चर्चा जोरात होती. पण उद्धव ठाकरे यांनी संयम काय असतो हे दाखवून दिलं. उद्धव ठाकरे cm uddhav thackeray) हे संध्याकाळी फेसबुक लाईव्ह आले. यावेळी त्यांनी शिंदे यांचा ओझरता आणि फक्त एकदाच उल्लेख करत या बंडावर भाष्य केलं. हे भाष्य करताना कुठेही आक्रस्ताळेपणा केला नाही. उलट शिंदेंच्या आजूबाजूला असणारे बंडखोर आपल्याकडे कसे वळतील अशा पद्धतीने त्यांनी साद घातली. एकाचवेळी कणखरपणा, भावनिक साद आणि काही संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांच्या कोर्टात चेंडू टाकला. बंडखोरांनीही क्षणभर विचार करावा, त्यांनाही अपराधीपणाची भावना वाटावी अशा पद्धतीने उद्धव ठाकरे बोलले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडातील हवा काढल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे हे मुत्सद्दी राजकारणी आहे. कोणत्या वेळी कोणती भूमिका घ्यावी हे त्यांना नेमकेपणाने माहीत आहे. शिवसैनिकांना काय आवडतं आणि काय बोललं पाहिजे हे उद्धव ठाकरे यांना पक्के ठावूक आहे. म्हणूनच त्यांनी टीका होऊनही आपल्या भाषणाची शैली बदलली नाही. शिवसैनिकांना जे आवडतं ते करण्यात ते पटाईत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी आज तेच केलं. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालेलं असतानाही उद्धव ठाकरेंनी संयमीपणा दाखवला. आज त्यांनी अत्यंत भावनिक भाषण केलं. मला पदाचा मोह नाही. मुख्यमंत्रीपदच काय, मी पक्षप्रमुखपदही सोडायला तयार आहे. पण बंडखोरांनी येऊन मला सांगितलं पाहिजे. माझ्या शिवसैनिकाने मला येऊन सांगितलं पाहिजे. तरच मी पद सोडेन, अशी भाविनक साद त्यांनी घातली. लाकूड तोड्याची गोष्ट सांगून तर त्यांनी शिवसैनिक आणि बंडखोर शिवसैनिकांच्या काळजालाच हात घातला. आपल्याच कुऱ्हाडीने आपल्याच झाडाच्या फांद्या तोडत तर नाही ना? असा भावनिक सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बंडखोरांना साद घातली. पण त्यांनी बंडखोरांवर एका शब्दानेही टीका केली नाही. उलट तुमचं काय म्हणणं आहे ते सुरतला जाऊन सांगायची गरज काय? तुम्ही समोर या. बसा आणि मला सांगा, असं आवाहनच त्यांनी केलं. यावेळी त्यांनी बंडखोरांना डिवचण्याची किंवा आव्हान देण्याची भाषाही केली नाही. आपलं हिंदुत्व कायम आहे. बाळासाहेब असताना आणि नसताना आपण ते टिकवून ठेवलं आहे. तसेच मागच्या सरकारमध्ये आपले जे नेते मंत्री होते, त्यांनाच या मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. मग काय बदललं? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी मुख्यमंत्रीपदावर बसण्यास नालायक असेल तर मला तसे सांगा. समोर या. किंवा फोन करून सांगा. मी आताच मुख्यमंत्रीपद सोडतो. हवं तर माझा राजीनामा तुमच्या हातात देतो, असं ते म्हणाले. मी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच, असं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंनाच चपराक लगावली. या वाक्यातून त्यांना बरंच काही सांगायचं आहे. तुम्ही बंड करून ज्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार आहात, ते तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार आहेत का? असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं. तुम्हाला भाजप मुख्यमंत्रीपद देणार आहे का? असा सवाल त्यांनी बिटवीन द लाईनमधून केला आहे.
उद्धव ठाकरे 18 मिनिटं बोलले. सुरुवातीचे दोन मिनिटं ते कोविडवर बोलले. मात्र नंतरची 16 मिनिटे त्यांनी बंडखोरांवर भाष्य केलं. या 18 मिनिटाच्या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा एकदाच उल्लेख केला. आदित्य ठाकरेंसोबत अयोध्यावारीला एकनाथ शिंदे सोबत होते असा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही. त्यांचा फोकस इतर बंडखोर शिवसैनिकांवर होता. त्यांच्या मनाची घालमेल कशी करता येईल यावर त्यांचा भर आहे. उद्धव ठाकरे यांना कोविडची लागण झाली आहे. पण तरीही त्यांनी मास्क घातलेला नव्हता. आपला चेहरा, चेहऱ्यावरील भाव आणि बॉडी लँग्वेज कळावी म्हणून त्यांनी हेतुपरत्वे मास्क घातला नसल्याचं सांगितलं जातं. माईंड गेम करणे हा या मागचा हेतू असल्याचं सांगितलं जातं.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील अत्युच्च शिखर म्हणजे त्यांनी राजीनामा देण्याची केलेली घोषणा. तुम्ही माझ्यासमोर या. मला सांगा मी सत्ता चालवण्यात नालायक आहे. मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडतो. मुख्यमंत्रीपदच काय? शिवसेना पक्षप्रमुखपदाचा राजीनामाही द्यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यांच्या भाषणातील हे सर्वोच्च टोक होतं. पक्षप्रमुख कसा असावा हेच त्यांनी आजच्या भाषणातून दाखवून दिलं. त्यामुळे शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोरांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
या भाषणात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत सकारात्मक विधान केलं. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले. या दोन्ही नेत्यांबद्दल सकारात्मक बोलून त्यांनी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी या भाषणातून भाजपवर बोलणं टाळलं. त्यांचा सर्व फोकस गेलेल्यांना परत आणण्यावर होता. म्हणून त्यांनी भाजपवर टीका केली नाही. किंवा आमदारांच्या बंडाला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला नाही. तसं ध्वनीतही त्यांनी केलं नाही. बंडखोर डिवचले जाणार नाही, पण ते अधिकाधिक भावनिक कसे होतील, यावरच त्यांनी आपल्या भाषणात अधिक भर दिला. अत्यंत संयमीपणे आणि तोलूनमापून ते बोलताना दिसत होते.